जम्मू-काश्मीर : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. शुक्रवारी (19 जानेवारी) सकाळपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील सुंदरबन येथे पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी सीमारेषेवर तैनात असलेले भारतीय सीमा सुरक्षा दलाचे लान्स नायक सॅम अब्राहम हे शहीद झाले आहेत. दरम्यान, जम्मूमधील आर.एस.पुरा सेक्टर, अर्निया व रामगड सेक्टर परिसरात सुद्धा पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात शुक्रवारी येथील दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले आहेत. याशिवाय, गुरुवारीदेखील (18 जानेवारी) आर.एस.पुरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार केला होता. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून 30 -40 भारतीय चौक्यांना टार्गेट करण्यात येत आहे. शिवाय, पाकिस्तानी रेंजर्स भारतीय नागरिकांना निशाणा बनवत आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार पोलीस जखमीपुलवामामधील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या पोलीस स्टेशनवर शुक्रवारी दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्लात चार पोलीस कर्मचारी जमखी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर दहशतवादी पसार झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांची दुसरी तुकडी दाखल झाली असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. तसेच, जखमी पोलीस कर्मचा-यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाकिस्तानला धडा शिकवा, बीएसएफच्या महासंचालकांचा आदेशभारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील स्थिती तणावपूर्ण आहे. नियंत्रण रेषेलगत गोळीबार केल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या नागरी वस्त्या आणि भारतीय लष्कराच्या सीमा चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात शहीद झालेले जवान ए. सुरेश यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महासंचालक शर्मा म्हणाले की, बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पाकिस्तानी रेंजर्सनी झाडलेली एक गोळी सीमेवरील खंदकातील निमुळत्या खिंडारातून पार होत या जवानाला लागली. पाकिस्तानच्या बाजूनेच वारंवार भारतीय हद्दीत विनाकारण गोळीबार आणि उखळी तोफांचा भडिमार केला जातो. तथापि, आम्ही दरवेळी पलटवार करून या अगोचरपणाचा बदला घेत असतो, असे शर्मा म्हणाले.