नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये फिरोजपूर येथे एका रॅलीला संबोधित करण्यासाठी जाणार होते. पण अचानक कार्यक्रम रद्द करावा लागला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा विमानतळावर माघारी परतत असताना आंदोलक शेतकऱ्यांनी ताफा अडवला आणि मोठा गहजब उडाला. आंदोलक शेतकऱ्यांच्या व्यत्ययामुळे पंतप्रधान मोदींचा ताफा जवळपास २० मिनिटं एका उड्डाणपुलावरच थांबून होता. या मुद्द्यावरुन जोरदार राजकारणाला सुरुवात झाली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्यांकडून पंजाब सरकारला धारेवर धरलं जात आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदर सिंग यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झालेल्या सुरक्षेच्या गैरसोयीबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच, मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी आणि गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंजाबचा कायदा व सुव्यवस्था फोल झाल्याचेही अरमिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या सीमारेषेपासून केवळ 10 किमी अंतरावरील मार्गावर आपण पंतप्रधानांसाठी सुरक्षित मार्ग देऊ शकत नाहीत. मग, आपणास पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे अरमिंदरसिंग यांनी म्हटलंय.
दरम्यान, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील ढिसाळपणाबद्दल राज्य सराकारचे कान टोचले आहेत. हे स्विकार्य नसून मोदींच्या रॅलीसाठी एक सुरक्षित मार्ग द्यायलाच हवा होता, असेही जाखड यांनी म्हटले.
केंद्रीय गृहमंत्रालयानेही व्यक्त केला संताप
देशाच्या इतक्या महत्त्वाच्या पदाच्या व्यक्तीच्या सुरक्षेबाबत इतकी मोठी चूक झालीच कशी? याला पंजाब सरकार जबाबदार आहे, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. तर केंद्रीय गृहमंत्रालयानंही संताप व्यक्त करत चन्नी सरकारकडे घटलेल्या घटनेबाबत सविस्तर अहवाल मागितला आहे. पण पंतप्रधानांचा दौरा निश्चित होत असताना त्याआधी सुरक्षेची पूर्णपणे व्यवस्था केली जाते. ऐनवेळी कोणतीही घटना घडल्यास पर्यायी मार्गांचाही विचार दौऱ्याच्या आधीच केला जातो. मग असं असतानाही आज मोदींचा ताफा कसा रोखला गेला असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पंतप्रधानांना परत जावे लागले याचे दुःख
मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, फिरोजपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अचानक परतावे लागले याचे मला दु:ख आहे. आम्ही पंतप्रधानांचा आदर करतो आणि मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना रिसीव्ह करण्यासाठी भटिंडाला जाणार होतो, पण माझ्यासोबत आलेले काही लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या संपर्कात मी आल्यामुळे पंतप्रधानांना रिसीव्ह करायला जाणे टाळले.