ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 24 - गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करुन त्यांची हत्या करायची. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाच्या विटंबनेचे व्हिडीओ रेकॉर्डीग करायचे असा कट पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने रचला होता. गुरुवारी रात्री पाकिस्तानच्या बॅट कमांडोनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईक एक बॅट कमांडो ठार झाला.
घटनास्थळावर सुरक्षादलांनी जे साहित्य जप्त केले त्यातून या कटाचा खुलासा झाला. ठार झालेल्या बॅट कमांडोकडे विशेष कटयार, हेडबँड कॅमेरा होता. जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात 600 मीटर आतपर्यंत भारतीय हद्दीत घुसखोरी करुन बॅट टीमने भारताच्या दोन जवानांवर हल्ला केला. यामध्ये महाराष्ट्रातील संदीप जाधव आणि सावन माने हे दोन जवान शहीद झाले. संदीप जाधव औरंगाबादच्या सिल्लोडमधल्या केळगावचे आहेत. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी केळगाव या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
सुरक्षा दलांना ठार मारलेल्या कमांडोकडे जे साहित्य सापडले त्यामध्ये कटयार, चाकू, कॅमेरा, एके रायफल, दोन ग्रेनेड होते. या घटनेने पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कराचा क्रूर चेहरा समोर आला आहे. हल्ला केल्यानंतर तात्काळ समोरच्याचा शिरच्छेद किंवा अवयव कापता येतील अशा प्रकारचे कटयार आणि चाकू सापडले आहेत. बॅटच्या हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद झाले. पण लगेच भारतीय लष्कराने हालचाल केल्यामुळे त्यांची पुढची सर्व योजना फसली असे अधिका-याने सांगितले.
भारतीय लष्कराच्या गोळीबारात एक बॅट कमांडो ठार झाला तर, एक जखमी झाला. ही संपूर्ण घटना घडली त्यावेळी हेडबँड कॅमे-याने पाकिस्तानी नियंत्रण कक्षात लाईव्ह प्रक्षेपण सुरु होते का ? त्याची चौकशी सुरु आहे. गोळीबारात जखमी झालेला दुसरा बॅट कमांडोही ठार झाला आहे याची आम्हाला खात्री आहे. पण टीममधील अन्य बॅट कमांडो त्याचा मृतदेह पीओकेमध्ये घेऊन जाण्यात यशस्वी ठरले. पाकिस्तानी लष्कराचे विशेष सैनिक आणि दहशतवादी यांचा बॅटमध्ये समावेश होतो. ज्यावेळी त्यांनी हल्ला केला त्यावेळी पाकिस्तानी लष्कराकडून मोठया प्रमाणावर गोळीबार सुरु होता.