ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्शवभूमीवर माध्यम क्षेत्रातील आघाडीचा समूह असलेल्या ' झी' समूहाने ' जिंदगी' चॅनेलवरील पाकिस्तानी मालिकांवर बंदी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ' हा निर्णय म्हणजे आपल्या देशावर सतत होणा-या दहशतवादी हल्ल्यांबदल निषेध नोंदवण्याचा एक प्रयत्न होता' असे 'झी' व ' एस्सेल' समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र गोयल यांनी स्पष्ट केले. ' या (उरी) हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्याची विनंती आम्ही पाकिस्तानी कलाकारांना केली होती, मात्र असे करण्यास त्यांनी नकार दिला' असेही गोयल यांनी नमूद केले. नवी दिल्लीतील पत्रकार परिषेदत बोलताना गोयल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
'झी जिंदगी चॅनेलवरून पाकिस्तानी मालिका काढून टाकण्याचा निर्णय दुर्दैवी होता खरा, मात्र प्रेम हे एकतर्फी असू शकत नाही' असे ते म्हणाले. 'भारत व पाकिस्तानातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी मी यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न केला आहे. जिंदगी चॅनेलद्वारे ( मालिकांद्वारे) पाकिस्तानी कलाकारांना भारतीयांच्या दिवाणखान्यात (आणि आयुष्यात) स्थान मिळाले. मात्र ते (पाकिस्तान) पुन्हा पुन्हा चुकीच्या गोष्टी करत राहिले.. आधी पठाणकोट आणि आता उरी (हल्ला)' असे सांगत चंद्रा यांनी आपल्या (पाकिस्तानी मालिक बॅन करण्याच्या )निर्णयाचे समर्थन केले.
गोयल यांनी गेल्या आठवड्यात शनिवारी ट्विटरवरून हा निर्णय जाहीर केला होता. ' पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्तराष्ट्रांच्या सभेत भारताविरुद्ध घेतलेली भूमिका दुर्दैवी असल्याचे सांगत झी समूह जिंदगी (चॅनेलवरील) पाकिस्तांनी कार्यक्रमांवर बंदी घालण्याच्या विचारात आहे' असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बोलताना गोयल यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
' आम्ही फवाद खान , माहिरा खान, अली जफर, शफाकत अमानत अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, वीणा मालिका, इम्रान अब्बास आणि अशा अनेक कलाकारांना उरी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्याची विनंती केली होती. मात्र त्यांच्यापैकी कोणीही असे करण्यास नकार दिला. तुम्ही पाकिस्तानचे नाव घेऊ नका, असे स्पष्ट केल्यानंतरही त्यांनी (कलाकार) आपली भूमिका सोडलीच नाही.. त्याला आपण तरी काय करणार?' असे चंद्रा यांनी नमूद केले.
' जर तुम्हाला लढायचेच असेल तर समोर येऊन लढा द्या, पण झोपलेल्या जवानांवर हल्ला का करता?' असे विचारत ( पाकिस्तानच्या) याच भूमिकेमुळे आम्ही हा निर्णय घेतला, असेही चंद्रा म्हणाले.
उरी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानलविरोधातील वातारवण तापू लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांत देश सोडून जावे अन्यथा आमच्या पद्धतीने हुसकावून लावू असा इशारा दिला होता. त्यानंतर फवाद खानसह अनेक कलाकार देश सोडून पाकिस्तानात परतले. मात्र मनसेचा विरोध अद्यापही कायम असून फवाद खानची भूमिका असलेला ' ऐ दिल है मुश्किल' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे.