अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने गुजरात किनारपट्टीवर भारताच्या जल हद्दीतून चालक पथकाच्या १० सदस्यांसह पाकिस्तानची एक मासेमारी बोट पकडली. या बोटीचे नाव ‘यासीन’ असून तटरक्षक दलाच्या ‘अंकित’ या जहाजाने ८ जानेवारीच्या रात्री गस्तीदरम्यान ही बोट पकडली. भारतीय जलहद्दीत येण्यामागच्या कारणांबाबत या बोटीच्या चालक पथकाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. अधिक चौकशीसाठी ही बोट ओढून पोरबंदरला नेली जात आहे, असे तटरक्षक दलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
भारतीय तटरक्षक दलाने मागच्या वर्षी १५ सप्टेंबर रोजी गुजरात किनारपट्टीतून १२ जणांसह पाकिस्तानची एक बोट पकडली होती. तसेच मागच्या वर्षी २० डिसेंबर रोजीही गुजरातच्या किनारपट्टीतून ६ जणांसह पाकिस्तानची एक बोट पकडली होती. यात ७७ किलो हेरॉइन होते. त्याची किंमत जवळपास ४०० कोटी रुपये होती. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातच्या दहशतवादीविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करुन ही बोट पकडली होती. मासेमारी करीत अनेकदा पाकिस्तानच्या मासेमारी करणाऱ्या बोटी आंतरराष्ट्रीय सागरी हद्द ओलांडून भारतीय सागरी हद्दीत येतात.
नेमके काय घडले?
या बोटीने पाकिस्तानच्या जलहद्दीत माघारी जाण्याचा प्रयत्न केला होता; परंतु, भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने शिताफीने कारवाई करुन ही बोट अडवून पकडली. बोटीतून २ हजार किलो मासे आणि ६०० लिटर इंधन जप्त करण्यात आले आहे. ही बोट पाकिस्तानच्या केटी बंदरात नोंदणीकृत आहे.