ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भारत व चीनमध्ये सीमावाद व डोकलाम विवादावर तणावाची परिस्थिती सुरू आहे. भारत व चीन दोन्ही देश आपल्या दृष्टीकोनामध्ये बदल करण्यास तयार नाहीत. यादरम्यान पाकिस्तान उद्दामपणा केला आहे. पाकिस्तानातील एका टीव्ही चॅनेल भारताविरोधात चुकीची माहिती पसरवत आहे.
पाकिस्तानी टीव्ही चॅनेल दुनया न्यूजनं असा दावा केला आहे की, चिनी सैनिकांकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात भारतीय लष्कराचे 158 सैनिक शहीद झाले आहेत. याशिवाय सोमवारी झालेल्या हल्ल्यात अन्य सैनिक जखमी झाल्याचीही खोटी बातमी या पाकिस्तानी चॅनेलनं प्रसारित केली. इतकंच नाही तर या पाकिस्तानी टीव्ही चॅनेलनं आपल्या वेबसाइटवर हल्ल्यासंदर्भातील फोटो पोस्ट करुन हद्दच पार केली. मात्र भारतीय लष्करानं फोटो बनावट असल्याचे सांगत वृत्त फेटाळून लावले आहे.
पाकिस्तानी टीव्ही चॅनेलनं दावा केला आहे की, सिक्कीम मुद्यावरुन भारत व चीनमध्ये चकमक सुरू झाली आहे. ज्यानंतर चीननं भारतीय सैनिकांवर रॉकेट हल्ला केला. ज्यात भारतीय लष्करातील 150 जवान शहीद झाले असून अन्य जवान जखमी झाले आहेत. या टीव्ही चॅनेलनं असाही कांगावा केला आहे की, विवादाची सुरुवात भारताकडून करण्यात आली होती. याला प्रत्युत्तर देताना चीननं भारतीय सैनिकांवर रॉकेट हल्ला केला.
चिनी न्यूज चॅनेलचा हवाला
दुनया न्यूजनं दावा केला आहे की, या हल्ल्याचं दोन मिनिटांचं फुटेज चाइन सेंट्रल टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात आलं होतं. चिनी सैनिकांनी रॉकेट लॉन्चर, मशिनगन व अन्य शस्त्रांचा वापर करुन भारतीय सैनिकांवर हल्ला केल्याचं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. भारत व चीननं दोन मोठ्या व काही छोट्या भागांवर वर्चस्व असल्याचा आपआपला दावा करत आहेत,ज्यामुळे ही बाब गेल्या दशकांपासून दोघांमध्ये विवादाचा मुद्दा बनला आहे.
दरम्यान, डोकलाममध्ये चीन सेन्यांकडून रस्ता बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, ज्याला भारतानं विरोध करत रस्ता बांधण्यापासून चीनला रोखले होते. या क्षेत्रावर चीन स्वतःचा दावा करत आला आहे. तर दुसरीकडे भारत या क्षेत्राला भुतानचा भाग मानून भुतानच्या दाव्याचं समर्थन करत आला आहे. भारतानं डोकलाम क्षेत्रातून मागे हटावं, अशी चीनचं म्हणणं आहे. मात्र अशा परिस्थितीत मागे हटण्यास भारत तयार नाही. या उलट भारतीय सैनिकांनी अधिक सैन्य तेथे तैनात केले आहे.
फोटो आहेत बनावट - भारतीय लष्कर
भारतीय लष्करानं हे फोटो बनावट असल्याचे सांगत म्हटले आहे की, हे फोटो अपघाताचे आहेत. हा अपघात अरुणाचल प्रदेशात सेनेच्या एका ट्रेनिंगदरम्यान झाला होता. या घटनेचे फोटो कित्येक महिन्यापूर्वींचे आहेत.