ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर मोठया प्रमाणात तणाव असताना भारतीय सीमेची जबाबदारी संभाळणा-या सीमा सुरक्षा दलाने सोमवारी एक आदर्श उदहारण घालून दिले. पाण्याच्या शोधात चुकून नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत आलेल्या एका १२ वर्षीय पाकिस्तानी मुलाला बीएसएफने पुन्हा पाकिस्तानी रेंजर्सकडे सोपवले.
एमडी तन्वीर असे या मुलाचे नाव आहे. पंजाब सीमेवरील दोना तेलू माल येथून रविवारी संध्याकाळी बीएसएफच्या जवानांनी तन्वीरला ताब्यात घेतले होते. पिण्याच्या पाण्याच्या शोधात हा मुलगा चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात आला होता असे बीएसएफच्या अधिका-यांनी सांगितले.
आणखी वाचा
बीएसएफने तन्वीरला आपल्या शिबीरात ठेवले व रात्रभर त्याची काळजी घेतली. तन्वीरने चुकून सीमा ओलांडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बीएसएफने पाकिस्तानी रेंजर्सशी संपर्क साधला व ठरलेल्या प्रक्रियेनुसार सकाळी ११ वाजता पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात दिले.
तन्वीर पाकिस्तानातील कासूर जिल्ह्यातील धारी गावचा आहे. मागच्या आठवडयात भारताचाही एक जवान चंदू बाबूलाल चव्हाण चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला. पण पाकिस्तानने चंदू चव्हाण आपल्याकडे नसल्याचे सांगितले आहे. चंदू बाबूलाल चव्हाण हा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचा आहे.