नवी दिल्ली-
सीमा सुरक्षा दलानं (बीएसएफ) पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ चार किलोग्रॅम वजनाचे ड्रग्ज घेऊन जाणारा पाकिस्तानी ड्रोन पाडला आहे. बीएसएफच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार ड्रोनचा आवाज काही जवानांनी ऐकला त्यानंतर या ड्रोनचा पत्ता शोधून काढण्यात आला. ड्रोन पाडण्यासाठी पॅरा बॉम्बचा वापर केला गेला आहे.
ड्रोनला एक छोटी हिरवी पिशवी जोडलेली होती आणि त्यात पिवळ्या फॉइलने बांधलेली चार पाकीटं होती आणि एक लहान पॅकेट काळ्या फॉइलनं बांधलेलं होतं. संशयित प्रतिबंधित पदार्थाचं पॅकिंगसह वजन सुमारे 4.17 किलो आणि काळ्या फॉइलमध्ये बांधलेल्या पॅकेटचे वजन सुमारे 250 ग्रॅम होतं. ड्रोनचे मॉडेल DJI Matrice 300 RTX होतं. याआधी 5 मार्च रोजी पठाणकोटमधील भारत-पाक सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली दिसल्या होत्या.
पंजाबला हादरा देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न!मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफ जवानांनी ड्रोनवर तत्काळ अनेक राऊंड गोळीबार केला. सुरक्षा दलांनी सांगितले की, ड्रोन भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करत होता. यावर बीएसएफ जवानांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर ड्रोन पाकिस्तानच्या सीमेकडे गेला. या घटनेची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सीओला दिली होती. अशीच एक घटना 9 फेब्रुवारी रोजी राज्यात घडली होती. सीमा सुरक्षा दलाने भारत-पाकिस्तान सीमेजवळ ड्रोनमधून अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
सातत्याने घडताहेत घटनागुरदासपूर सेक्टरच्या पंजग्रेन भागात पाकिस्तानकडून भारतीय हद्दीकडे उडणाऱ्या एका संशयास्पद वस्तूचा आवाज आला, त्यानंतर जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला. घग्गर व सिंघोके या गावाच्या परिसरात झडती घेतली असता संशयित अमली पदार्थासह पिवळ्या रंगाची दोन पाकिटेही जप्त करण्यात आली. ही पाकिटे ड्रोनने टाकल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. पॅकेटमध्ये एक पिस्तूल देखील गुंडाळले होते आणि कुंपणापासून सुमारे 2.7 किमी अंतरावर असलेल्या शेतात माल सापडला होता. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल १० फेब्रुवारीला जाहीर होणार आहेत. अशा परिस्थितीत राज्यात सातत्याने घडणाऱ्या अशा घटना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत चिंताजनक आहेत.