जम्मू : जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक संशयित पाकिस्तानी ड्रोन दिसल्यामुळे खळबळ उडाली. या प्रकारानंतर सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोधसत्र हाती घेतले व भारतीय सीमेत काही पडले तर नाही ना, याची शहानिशा करण्यात आली. परंतु काहीही आढळले नाही.
शनिवारी रात्री उशिरा कनचक सेक्टरमध्ये एक संशयित पाकिस्तानी ड्रोन आकाशात उडताना दिसले. त्याचप्रमाणे काही स्थानिक लोकांना आकाशात पिवळ्या रंगाची वस्तू घिरट्या घालताना दिसली व नंतर अंधारात गायब झाली. रविवारी पहाटे सुमारे ५.३० वाजता लष्कर, सीमा सुरक्षा दल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दीड किलोमीटर अंतराच्या पल्ल्यात पंच तल्ली व लालियालच्या मोठ्या परिसरात शोधसत्र हाती घेतले.
या शोधसत्राबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ड्रोनच्या संशयास्पद वातावरणानंतर कनचक सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर शोधसत्र हाती घेतले. परंतु काहीही आक्षेपार्ह मिळाले नाही. अतिरेकी शस्त्रास्त्रे किंवा अंमलीपदार्थ भारतीय हद्दीमध्ये टाकण्यासाठी ड्रोनचा वापर करीत आहेत. तो हाणून पाडण्यासाठी भारतीय सुरक्षा दल सीमेवर सतर्क आहेत.’
दोनच दिवसांपूर्वी पाकच्या ड्रोनने टाकली होती शस्त्रेदोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या ड्रोनने जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक एके ४७ रायफल, एक पिस्तूल व अन्य काही शस्त्रास्त्रे टाकली होती. त्यानंतरमागील वर्षी २० जून रोजी कथुआमध्ये सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी हेक्साकॉप्टर ड्रोन पाडले होते. त्यातून अमेरिकेत उत्पादित एम ४ अर्धचलित कार्बाईन व सात चिनी स्फोटके आढळली होती.