ऑनलाईन लुडो खेळत असताना भारतीय मुलायम सिंहच्या प्रेमात पडलेली 19 वर्षीय पाकिस्तानी मुलगी इकरा जिवानीला रविवारी पाकिस्तानात परत पाठवण्यात आले आहे. बीएसएफच्या जवानांनी इकराला अमृतसरच्या अटारी-वाघा सीमेवर पाक रेंजर्सच्या ताब्यात दिले. जेव्हा इकरा पाकिस्तानातील तिच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा ती केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या निशाण्यावर आली.
केंद्रीय यंत्रणांनी कर्नाटक गुप्तचर यंत्रणांना सतर्क केलं होतं. ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा पोलिसांना संशय होता, पण तपासानंतर भारत सरकारने तिला पाकिस्तानात परत पाठवण्याचा निर्णय घेतला. भारतात बनावट ओळख करून राहणारी पाकिस्तानी मुलगी इकरा जिवानी आणि तिचा प्रियकर, 25 वर्षीय मुलायम सिंह यादव यांना जानेवारीत बंगळुरूमध्ये अटक करण्यात आली होती. दोघेही बराच वेळ ऑनलाईन लुडो खेळत असत, याचदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
प्रियकराने तिला मागच्या वर्षी नेपाळला बोलावले होते, जिथे त्यांचे लग्न झाले होते. बिहारमधील बीरगंजला जाण्यासाठी हे जोडपे भारतात आले आणि तेथून पटना गाठले. यादव आणि इकरा नंतर बंगळुरूला गेले आणि जुन्नसांद्रा येथे भाड्याच्या घरात राहू लागले, जिथे यादवने सप्टेंबर 2022 पासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. रिपोर्टनुसार, इकराचे नाव बदलून रवा यादव असे केल्यानंतर मुलायमने तिचे आधार कार्ड घेतले आणि भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला.
एका हिंदू मुलीला त्यांच्या घरात नमाज करताना पाहून मुलायमच्या शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर मुलायमच्या घरावर छापा टाकला. इकरा आणि तिचा पाकिस्तानी पासपोर्ट जप्त केला. इकराला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आणि अटारी सीमेवरून पाकिस्तानात परत पाठवण्यासाठी अमृतसरला आणलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"