श्रीनगर - पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. सीमारेषेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्ताननं आता भारताच्या हवाई सीमेचे उल्लंघन करत घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरनं घुसखोरी केली. रविवारी (30 सप्टेंबर) दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत घुसले. ही बाब भारतीय जवानांच्या लक्षात येताच, त्यांनी प्रत्युत्तर म्हणून हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर हेलिकॉप्टर माघारी परतल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत दहशतवादाच्या मुद्यावरुन फटकारल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. शांततेसाठी चर्चा करण्याऐवजी भारत राजकारणाला पसंती देत असल्याच्या उलट्या बोंबा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी मारल्या आहे. शिवाय, त्यांनी काश्मीरचा मुद्दादेखील यावेळी उपस्थित करत धमकी देखील दिली होती. ''काश्मीरचा मुद्दा हा गेल्या 70 वर्षांपासून प्रलंबित आहे आणि या न सुटलेल्या वादामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात अडचणी निर्माण होत आहेत'', असे कुरैशी यांनी म्हटले.
पुढे ते असंही म्हणाले की, ''भारतानं आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. भारतानं हल्ला करण्याची चूक केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. आम्ही पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही'', असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवून दिला आहे. यानंतर रविवारी दुपारी पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरनं भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला.
सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला फटकारलं
दुसरीकडे, शनिवारी (29 सप्टेंबर)संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये सुषमा स्वराज यांनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेवर सडकून टीका केली. ''पाकिस्तान हा असा शेजारी देश आहे, की ज्याने दहशतवाद पसरवण्याबरोबरच त्याला नाकारण्याचेही कसब मिळवले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन असून 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड उघड माथ्याने हिंडत आहे'', असा शब्दांत स्वराज यांनी पाकिस्तानला फटकारलं.
9/11 चा न्यू-यॉर्कवरील हल्ला आणि 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांनी शांततेच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे. भारत दहशवादामुळे त्रस्त असून शेजारील देशच याला खतपाणी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या कृत्यांमुळे शांततेसाठीची चर्चा रद्द करण्यात आली आहे. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासमोर चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता. भारतही तयार होता. मात्र, पाकिस्तानने भारताच्या तीन जवानांचे अपहरण करुन एकाची हत्या केली. यामुळे, चर्चेसाठी भारताने पाकिस्तानला नकार दिल्याचे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.