जोधपूर : दीर्घ काळापासून व्हिसाच्या आधारे भारतात वास्तव्याला असलेल्या किमान १०० पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची सुविधा केंद्रीय गृह मंत्रालय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी येथील दोन दिवसांच्या शिबिरात उपलब्ध करवून दिली आहे.शंभरावर पाकिस्तानी हिंदूंनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला असून, अनेकांनी भारतात वास्तव्यासाठी दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केले आहेत. भारताचे नागरिकत्व मिळविण्यासंबंधी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्यांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे जोधपूरचे जिल्हाधिकारी विष्णू चरण मलिक यांनी सांगितले. गेल्या वर्षी मार्चपर्यंत १७०२ अर्ज आले असून, प्रशासनाने त्यापैकी १६८ जणांना भारतीय नागरिकत्व देण्याची शिफारस केली आहे. उर्वरित अर्जांमध्ये चुका असल्यामुळे त्यासंबंधी प्रक्रिया पुढे नेता येणार नाही. अनेक अर्जदार शहानिशेच्या वेळी उपस्थित झाले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. (वृत्तसंस्था)>मातापित्याच्या जन्मदाखल्याची अट शिथिल यापूर्वी अखंड भारतात मातापित्याचा जन्म झाल्यासंबंधी प्रमाणपत्राची घातलेली अट रद्द करण्यात आली आहे. अर्जदारांनी गेल्या वर्षभरात पाकिस्तानात प्रवास केलेला नाही असे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची अटही शिथिल करण्यात आल्याचे मलीक यांनी सांगितले.पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या सहा महिन्यांत त्याची निष्पत्ती दिसून येईल. या मुद्द्यावर आम्ही पूर्णपणे तोडगा काढण्याचे ठरविले आहे. - राजीव महषी, केंद्रीय गृहसचिव
पाकिस्तानी हिंदूंना मिळणार भारतीय नागरिकत्व
By admin | Published: July 01, 2016 5:17 AM