लंडन: भारताकडून 29 सप्टेंबर 2016 रोजी करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी माझ्याशी फोनवर बोलायलाही घाबरत होते, असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते बुधवारी लंडनच्या टाऊन हॉलमध्ये झालेल्या 'भारत की बात सबके साथ' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकच्यावेळचा एक प्रसंग उपस्थितांसमोर कथन केला. सर्जिकल स्ट्राईकची माहिती सार्वजनिक करण्यापूर्वी आम्ही पाकिस्तानलाही याबद्दल कळवले होते. जेणेकरून या हल्ल्यात ठार झालेल्या त्यांच्या सैनिकांचे मृतदेह त्यांना परत नेता यावेत. त्यासाठी आम्ही सकाळी 11 च्या सुमारास पाकिस्तानमध्ये फोन केला. मात्र, तेव्हा पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसह सर्वच अधिकारी प्रचंड घाबरले होते. त्यामुळे कोणीही माझ्याशी फोनवर बोलायला तयार नव्हते. अखेर दुपारी 12 च्या सुमारास आम्ही त्यांच्याशी बोललो व त्यानंतर ही माहिती सार्वजनिक केली, असे मोदींनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. या हल्ल्यामुळे आता भारताकडूनही आपल्याला जशास तसे प्रत्युत्तर मिळणार, याची जाणीव पाकिस्तानला झाली. इतकी वर्षे दहशतवाद पसरवणाऱ्यांना मला हेच सांगायचे होते की, भारत बदलला आहे आणि त्यांची आगळीक खपवून घेतली जाणार नाही. सर्जिकल स्ट्राईकच्यानिमित्ताने आम्ही त्यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिले, असे मोदींनी म्हटले.
प्रसिद्ध कवी प्रसून जोशी यांनी मोदींची मुलाखत घेतली. यावेळी मोदींना कठुआ आणि उन्नावमधील सामूहिक बलात्काराच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आले. त्यावर मोदींनी म्हटले की, अशाप्रकारच्या बलात्काराच्या घटना ही चिंतेची बाब आहे. देशासाठी हा कलंक आहे. ही विकृती कदापि सहन केली जाऊ शकत नाही. परंतु, बलात्काराच्या घटनांचे राजकारण होता कामा नये, असे मोदींनी सांगितले.