इस्लामाबाद: लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयाबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं फोनवरुन अभिनंदन केलं. दोन्ही देश जनतेच्या भल्यासाठी काम करतील, अशी आशा खान यांनी व्यक्त केली. भारतीय उपखंडाच्या समृद्धासाठी हिंसामुक्त आणि दहशतवादमुक्त वातावरण आवश्यक असल्याचं मोदींनी खान यांना सांगितलं. फेब्रुवारीत पुलवामात झालेला हल्ला, त्यानंतर भारतानं केलेला एअर स्ट्राइक या घटनांमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी प्रथमच फोनवरुन संवाद साधला.इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना फोन केल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी दिली. 'पंतप्रधानांनी (इम्रान खान) आज मोदींशी संवाद साधला. त्यांच्या पक्षानं निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केलं. दोन्ही देशांमधील लोकांच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली,' असं फैसल यांनी ट्विट करुन सांगितलं. दक्षिण आशियातील शांतता, विकास आणि समृद्धीसाठी मोदींसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं इम्रान यांनी मोदींना सांगितल्याची माहितीदेखील फैसल यांनी ट्विटमधून दिली. इम्रान खान यांनी मोदींचं फोनवरुन अभिनंदन केल्याच्या वृत्ताला भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दुजोरा दिला. 'पंतप्रधान मोदींना आज पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी फोन केला होता. खान यांनी मोदींचं निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केलं. यावेळी मोदींनी खान यांना गरिबीच्या समस्येशी लढण्याचा सल्ला दिला. आशिया खंडाच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी दहशतवादमुक्त वातावरण गरजेचं आहे, असं मोदींनी खान यांना सांगितलं,' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली.