ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - पाकिस्तानी कलाकारांच्या भारतात काम करण्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी सर्व स्तरातून होत असताना पाकिस्तानी गायक शफाकत अमानत अलीने उरी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. मी उरी हल्ल्याचा निषेध करतो. मला इतरांबद्दल माहित नाही असे शफाकत अमानत अलीने टाइम्स नाऊ चॅनलवर बोलताना सांगितले.
पाकिस्तानी कलाकार भारतात येऊन काम करतात पण दहशतवादी हल्ल्यांचा साधा निषेधही करत नाहीत याबद्दल शफाकत यांना विचारले असता ते म्हणाले की, पाकिस्तानी कलाकारांना धमक्यांची पत्रे येतात त्यामुळे ते जाहीर निषेध व्यक्त करत नाहीत, पण माझ्या माहितीनुसार पाकिस्तानी कलाकारांचाही दहशतवादाला विरोधच आहे.
आणखी वाचा
शफाकत अमानत अली पहिले पाकिस्तानी कलाकार आहेत ज्यांनी ऑन रेकॉर्ड उरी दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला. या हल्ल्यात भारताचे १९ जवान शहीद झाले. भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावामुळे मागच्या आठवडयात ३० सप्टेंबर रोजी शफाकत यांचा बंगळुरुमध्ये होणारा कार्यक्रम आयोजकांनी रद्द केला होता.