नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. भारतही पाकिस्तानवर कोणत्या तरी मोठ्या कारवाईच्या पवित्र्यात असल्याची भीती पाकिस्तानला सतावते आहे. त्यामुळे पाकिस्तान फारच घाबरला असून, त्यानंतर LOCजवळ सर्वच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच सियालकोट बॉर्डरजवळ स्वतःचे टँक पाठवले आहेत.
एका पाकिस्तानी ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोहम्मद साद नावाच्या व्यक्तीनं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानानं पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक गावांना रिकामी केलं आहे, तसेच इतर लोकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवरील लोकांचं ये-जा करणं थांबवलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधल्या 127 गावांना हाय अलर्ट जारी केला आहे. LoCजवळच्या 40 गावांना रिकामी केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरलं आहे. भारतीय शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत भारतानं पाकिस्तानला दिले आहेत. तत्पूर्वी पाकिस्ताननं दहशतवादी मसूद अझहरला बहावलपूर हेडक्वॉर्टरवरून हटवून दुसरीकडे पाठवलं आहे. पाकिस्तान सरकारनं मसूद अझहरला रावळपिंडीतल्या एका सुरक्षित ठिकाणी पाठवलं आहे. रावळपिंडीमध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIचं हेडक्वॉर्टर आहे.