ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मिर खोऱ्यातील सुरक्षेविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. काश्मिर खोऱ्यातील सुरक्षेच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानमधून येणाऱ्या दहशतवाद्यांची घुसखोरी 45 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. मोदी सरकारला तीन वर्ष पुर्ण झाल्या निमित्त आयोजीत एका कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी कामाचा लेखाजोखा मांडला.
भारतीय सैन्याने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. या सर्जिकल स्टाईकमध्ये एलओसीवरच्या दहशतवाद्यांच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. तसंच बऱ्याच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं.
"जम्मू आणि काश्मिरमधील सुरक्षा परिस्थिती सुधारली आहे. तसंच 2014 ते 2017 या तीन वर्षात तब्बल 368 दहशतवाद्यांना मारण्यात लष्कराला यश आल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.
जम्मू-काश्मिरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादाला मूळापासून संपवणार असल्याचंही या कार्यक्रमात राजनाथ सिंह म्हणाले आहेत. सरकारने दहशतवादाविरोधात चांगलं अभियान सुरू केलं आहे आणि देशात मुस्लिमांची संख्या जास्त असूनही आयसीस सारख्या संघटनांना भारतात मजबूत होऊ दिलं नाही, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे.