जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एका दहशतवादी कट-कारस्थानाचा भारतीय लष्कराने पर्दाफाश झाला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथून अटक करण्यात आलेल्या एका दहशतवाद्याने उघड केले आहे की, तो भारतात आत्मघातकी मोहीम राबवणाऱ्या एका गटाचा भाग होता. दहशतवादी तबराक हुसेन याला भारतीय लष्कराने 21 ऑगस्ट रोजी पकडले होते. त्याने तीन-चार दहशतवाद्यांसह नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांत राजौरी आणि पूंछ सारख्या जिल्ह्यांमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे.
राजौरी येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला दहशतवादी तबराक हुसेन म्हणाला, "मी आत्मघातकी मोहिमेवर इतर चार ते पाच जणांसह येथे आलो होतो... पाकिस्तानी लष्कराचे कर्नल युनूस यांनी पाठवले होते. मला भारतीय सैन्यावर हल्ला करण्यासाठी 30,000 रुपये दिले होते". याचबरोबर, मला सहा भाऊ आहेत. कुटुंबात एकूण 15 लोक आहेत. तारबंदीजवळ गोळीबारात मी जखमी झाल्यावर साथीदार दहशतवाद्यांनी मला सोडून पळ काढला, असेही तबारक हुसैनने सांगितले.
नौशेरा सेक्टरमधील सेहर मकरी भागात रविवारी संध्याकाळी लष्कराच्या जवानांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर जवानांनी केलेल्या प्रत्त्युत्तरात दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेच्या पाकिस्तानी बाजूने परत पळायला सुरुवात केली. एका अधिकाऱ्यांनी सांगितले, जवानांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला. यावेळी एक दहशतवादी जखमी अवस्थेत पकडला.
या दहशतवाद्यावर प्रथमोपचार करून राजौरी येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौकशीदरम्यान, नियंत्रण रेषेवरील लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी या दहशतवाद्याला लष्कर-ए-तैयबाचे आत्मघाती पथक म्हणून पाठवण्यात आले होते. तसेच, या दहशतवाद्याने सीमा ओलांडण्याची ही दुसरी वेळ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.