एहसान अहमद त्याचं नाव. तो मूळचा पाकिस्तानी; पण गत ७-८ वर्षांपासून अमेरिकेत वॉशिंग्टनला राहतो. लाहोरपासून २०० किलोमीटरवर सारगोधा त्याचं गाव. त्याच्या आईचा जन्म पाकिस्तानात झाला असला, तरी तिचे आई-बाबा म्हणजे एहसानचं आजोळ भारतातल्या भागवानचं. गुरदारपूरजवळचं. तिची इच्छा होती, आई-बाबांचं गाव पाहावं; पण ते झालं नाही. एहसान सांगतो, ‘आमच्या भागात वाडवडिलांचं घर पाहणं, तिथं काही दिवस राहणं याला नशीब लागतं म्हणतात. मला माझ्या आईसाठी ते करायचं होतं!’ तिला व्हिसा मिळाला नाही, पण एहसानला आठ दिवसांचा व्हिसा मिळाला. तो १२ मार्चला अटारी सीमेवरून भारतात आला. गावी गेला. तिथं बुजुर्गांना भेटला. आजोबांच्या आठवणी सांगितल्या. काही लोक त्यांना ओळखणारे भेटले. त्यांनी आगतस्वागत केलं. १९ मार्चला तो परत पोहोचला अटारीवर, तर त्याला सांगण्यात आलं की, देशाच्या सीमा बंद झाल्या असून, तुला जाता येणार नाही. त्याचा व्हिसाही संपत होता. त्यानं भारत सरकारला ट्विट करत अडचण सांगितली; पण २२ मार्चला जनता कर्फ्यु होता आणि पुढे देशभर लॉकडाऊन झालं. विदेशींना क्वारंटाईन करून गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं. तिथंच एहसानचीही सोय केली. दुश्मन मुल्ख म्हणून ज्या देशाविषयी माहिती मिळाली, तेथे तो क्वारंटाईन झाला होता. तो सांगतो, तिथं मलेशियन, जर्मन लोकही होते.एहसान सांगतो, ‘भारत सरकार आमची उत्तम काळजी घेत होतं. खायची व राहायची सोय होती; पण मन बेचैन होतं. ज्या देशात यायचे स्वप्न लहानपणापासून पाहिलं, व्हिसा मिळावा म्हणून प्रयत्न केले, व्हिसा मिळाला तेव्हा आठ दिवस का होईना म्हणत आलो, किती आनंद झाला होता! व त्याच देशात अडकून पडायची वेळ आली!’ १६ एप्रिलला त्याला सरकारने कळवलं की, अटारीहून तुमची जायची सोय केली आहे, तुम्ही जाऊ शकता! एहसान पाकिस्तानात परतला आहे!
पाकिस्तानी तरुण भारतात आला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 3:03 AM