जयपूर - पाकिस्तानमधील एक तरुण सोशल मीडियावर मुंबईत राहणाऱ्या एक तरुणीच्या प्रेमात पडला. मात्र ही दोस्ती त्याला चांगलीच महागात पडली. प्रेमात वेड्या झालेल्या या तरुणाने तरुणीला भेटण्यासाठी भारत-पाक सीमेवरील काटेरी कुंपण पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे कुंपण पार करत असताना बीएसएफच्या जवानांनी त्याला पकडले. सध्या सुरक्षा यंत्रणा या तरुणाची चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री श्रीगंगानगरमधील अनूपगड क्षेत्रामध्ये भारतपाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या कैलाश तसेच शेरपुरा पोस्टदरम्यान, एक पाकिस्तानी तरुण झीरो लाईन पार करून काटेरी कुंपणाकडे पोहोचला. त्याने हे काटेरी कुंपण पार करण्याचा प्रयत्न करताच बीएसएफच्या जवानांनी त्याला इशारा देत पकडले. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नावर मोहम्मद अस्लम असल्याचे सांगितले.
सदर तरुण पाकिस्तानमधील बहावलपूरमध्ये राहणारा आहे. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून पाकिस्तानी चलन आणि एक मोबाईल फोन सापडला. प्राथमिक चौकशीमध्ये या तरुणाने सोशल मीडियावरून त्याची मैत्री मुंबईतील एका तरुणीशी झाल्याचे सांगितले. हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. सध्या सीमासुरक्षा दलासह सुरक्षा एजन्सी या पाकिस्तानी तरुणाची सखोल चौकशी करत आहेत.
हल्लीच गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या बहावलपूरमधील राहणारा ३० वर्षीय तरुण अल्लादीन याला श्रीगंगानगरमधील रावला ठाणे क्षेत्रामध्ये बीएसएफने पकडले होते. मात्र त्याच्याकडे घेण्यात आलेल्या तपासणीमध्ये काही आक्षेपार्ह सापडले नव्हते. रस्ता चुकल्याने तो भारताच्या हद्दीत आला असावा, अशी शक्यता वर्तवली गेली होती बीएसएफने पाकिस्तानी रेंजर्सना भेटून त्याला पूशबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रेंजर्सनी त्याला परत घेण्यास नकार दिला होता.