हरिश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या हवाई हद्दीत पाकिस्तानच्या लढावू विमानांनी घुसखोरी केल्याचा संदेश हाती पडताच पंतप्रधान नरेंद्र मोदीधीरगंभीर चेहऱ्याने विज्ञान भवन येथील नियोजित कार्यक्रम मध्येच सोडून कार्यालयाकडे रवाना झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाकिस्तानस्थित प्रशिक्षण तळावर आदल्या दिवशी भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बुधवारी घडलेल्या ताज्या घडामोडींवर तसेच पाकिस्तानच्या या दु:साहसावर पुढे कशी पावले उचलवीत, या महत्त्वाच्या मुद्यावर सुरक्षा सल्लागार अजित डोवल, भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अन्य सुरक्षा दलाचे अधिकाऱ्यांनी मंथन केले. त्यानंतर पंतप्रधानांना ताज्या घडामोडींची माहिती देण्यात आली.
सध्याच्या परिस्थितीत मोदी सरकार विविध पर्यायांवर विचार करत आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील पायलटला परत आणणे आणि पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या अझहर मसूदला भारत ताब्यात घेणे ही भारताची सध्याची प्राथमिकता आहे. भारत आता जगाकडे अशी मागणी करू शकेल की, पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणारा अझहर मसूद हा कुठे आहे हे प्रथम निश्चित करा आणि तो आमच्या ताब्यात द्या. पण, चर्चेच्या पर्यायावर मोदी सरकार तयार नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. हीच स्थिती राहिल्यास दोन्ही देशांतील तणाव कायम असेल.