इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे ७ सैनिक मारले गेले असल्याचा दावा सोमवारी पाकिस्तानने केला आहे. भिम्बेर सेक्टरमध्ये रविवारी रात्री ७ सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, विनाकारण गोळीबार करणाऱ्या पाकी जवानांना धडा शिकविण्यासाठी रविवारी रात्री भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या वेळी भारताने तोफगोळ्यांचाही तुफानी मारा केला आणि रणगाडेविरोधी क्षेपणास्त्रही वापरले, असे कळते. मात्र भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा उलट्या बोंबा मारणे पाकने सुरू केले आहे. प्रत्यक्षात भारतीय सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवान आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत. पाकिस्तानच्या गोळीबारातही भारताचे काही जवान शहीद झाले आहेत.
भारताचेही मोठे नुकसान?-पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, आमच्या सैनिकांनी भारतीय गोळीबाराला तोडीस तोड उत्तर दिले. त्यात भारतीय जवान निश्चितपणे मरण पावले आहेत. मात्र भारत ही माहिती लपवून ठेवत आहे.
उच्चायुक्तांना केले पाचारण-या घटनेनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावाले यांना पाचारण करून, भारतीय कृतीचा निषेध केला. याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही सचिव ऐझाज चौधरी यांनी बंबावाले यांना दिला. पाकचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी आपल्या जवानांना भारताच्या गोळीबाराला जशास तसे उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. मृत जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रावळपिंडीला आलेल्या शरीफ यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले की, भारतीय सैन्याला अजिबात भीक घालू नका. देशाचे संरक्षण हे आपले पहिले कर्तव्य आहे. (वृत्तसंस्था)