नवी दिल्ली : पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या सशस्त्र कमांडोंनी गुजरातच्या कच्छमध्ये घुसखोरी केल्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे या राज्यातील कांडला, मुंदरा या बंदरांची सुरक्षा व्यवस्था गुरुवारी अधिक कडक करण्यात आली आहे.
यासंदर्भात कांडला बंदराच्या अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने कळविले आहे की, पाकिस्तानच्या सशस्त्र कमांडो किंवा दहशतवाद्यांनी हरामी नाला क्रीक भागातून कच्छमध्ये घुसखोरी केली असण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये घातपात घडविण्याची त्यांची योजना असू शकते. त्यामुळे बंदर तसेच त्यानजिक समुद्रात उभ्या असलेल्या जहाजांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. काही संशयास्पद हालचाली आढळल्यास या जहाजांवरील कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा. कांडला बंदराचे आता दिनदयाळ बंदर असे नामकरण करण्यात आले आहे. मुंदरा बंदराचे व्यवस्थापन अडानी उद्योगसमुहाकडून पाहिले जाते. कांडला, मुंदरा ही दोन्ही बंदरे कच्छच्या आखातात असून पाकिस्तानपासून भौगोलिकदृष्ट्या जवळ आहेत. जामनगर येथे रिलायन्सचा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. रशियाची तेलकंपनी रॉसनेफ्टचा अशाच प्रकारचा प्रकल्प गुजरातमधील वदिनार येथे आहे.समुद्रकिनारी गस्तही वाढवलीजम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या अंगाचा तिळपापड झाला आहे. काश्मीर प्रश्नावरून दोन्ही देशांतील तणाव पुन्हा वाढला आहे.पोलीस महानिरीक्षक (सीमा विभाग) डी. बी. वाघेला यांनी सांगितले की, पाकिस्तानातून सशस्त्र कमांडो किंवा दहशतवाद्यांनी कच्छमध्ये घुसखोरी केल्याची माहिती मिळाल्यामुळे या भागात नौदल व सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क आहेत.च्गुजरातच्या समुद्रकिनारी भागात पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे.