लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: “पाकिस्तान एक प्रकारच्या आर्थिक संकटात आहे; परंतु, लष्करीदृष्ट्या त्याच्या क्षमतेत कोणतीही कमी नाही आणि पाकिस्तानचे सशस्त्र दल आपल्यासाठी धोका आहे,” असे मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले. एका खासगी वृत्तवाहिनी समूहाच्या शिखर संवादात त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
यावेळी जनरल चौहान म्हणाले की, भारताकडे आपल्या सीमांची काळजी घेण्यासाठी विपुल संसाधने आहेत, विशेषत: उत्तरेकडील विवादित सीमा खूप चांगल्या प्रकारे सुरक्षित आहेत. मला वाटतं, “जर तुम्ही सशस्त्र दलांकडे पाहिले, तर सर्वांत मोठे आव्हान हे बाहेरील आक्रमणाचे असते. आणि ते तत्काळ चिंतेचे आहे. पण मग बाहेरील आक्रमणाची आव्हानेही देशाला एकत्र आणतात. आपण ते कारगिलमध्ये पाहिले आहे, आपण ते गलवानमध्ये पाहिले आहे,” असे जनरल चौहान म्हणाले.
भारतीय सशस्त्र दलांबाबत बोलायचे झाल्यास आमच्यापुढे सध्या सर्वांत मोठे आव्हान हे चीनचा उदय व त्यासोबत विवादित सीमारेषांचे आहे. आपल्या दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये (पाकिस्तान आणि चीन) सध्या हिमालयापेक्षा उंच आणि समुद्रापेक्षा खोल मैत्री आहे. ही दोन्ही आण्विक राष्ट्रे आहेत. दोघांचेही आपल्यासोबत संबंध सध्या ताणलेले आहेत, असेही चौहान यांनी नमूद केले.
पाकिस्तान आर्थिक संकटात असू शकतो आणि राजकीयदृष्ट्याही थोडा अस्थिर असू शकतो, आता त्यांच्याकडे एक सरकार आहे. परंतु, प्रत्यक्षात लष्करीदृष्ट्या त्याच्या क्षमतेत कोणतीही कमतरता नाही. आपण आपल्या शत्रूला पूर्ण गुण दिले पाहिजेत. त्यांनी त्यांची क्षमता टिकवून ठेवली. त्यामुळे, पाकिस्तानचा धोका कायम आहे, पाकिस्तानच्या सशस्त्र दलांचा धोका राहणार नाही, असे तुम्ही म्हणू शकत नाही.- जन. अनिल चौहान, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ