ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 4 - भारताने सर्जिकल स्ट्राईक केलाच नाही असा कांगावा करणारं पाकिस्तान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या व्हिडीओचा वापर करत भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. अरविंद केजरीवाल यांनीच हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अरविंद केजरीवाल उरी दहशतवाही हल्ल्यावर तसंच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर बोलताना दिसत आहेत.
पहिल्या 40 सेकंदात केजरीवाल पंतप्रधानांची स्तुती करताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या चुकीच्या धोरणांवरही भाष्य केलं आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी या व्हिडीओतून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या अजेंडा जगासमोर आणला पाहिजे असं सांगत सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे सादर करण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. केजरीवाल यांच्या व्हिडीओचा पाकिस्तानी मीडियाने पुरेपूर वापर करुन घेतला आहे. सर्जिकल स्ट्राईक झालीच नाही असा दावा पाकिस्तान पहिल्या दिवसापासून करत आहे. त्यामुळे पाकिस्तानी मीडियाने केजरीवाल यांचा हा व्हिडीओ हेडलाईन्समध्ये वापरत दिल्लीचे मुख्यमंत्र्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्याची बातमी लावून धरली. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनीही भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं वृत्त द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिलं.
या व्हिडीओमध्ये केजरीवालांनी पंतप्रधान मोदींच्या इच्छाशक्तीची स्तुती करत त्यांना सलामदेखील केला आहे. कधी नव्हे ते केजरीवाल यांनी पंतप्रधानांची स्तुती केल्याने भाजपादेखील आश्चर्य व्यक्त करत आहे. पंतप्रधानांना घाबरट आणि मनोरुग्ण म्हणणारे केजरीवाल स्तुती कसं काय करु लागले ? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. मात्र केजरीवालांचा मुख्य उद्धेश सर्जिंकल स्ट्राईकचे पुरावे मागणे होता असं भाजपाने सांगितलं आहे.