नवी दिल्ली - राजधानी दिल्ली येथील शाहीन बाग आणि जाफराबाद येथे नागरिकता संशोधन कायदा (CAA) आणि एनआरसीविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी केला आहे. पाकिस्तानने हे षडयंत्र रचल्याचे त्यांनी म्हटले आहे. गिरीराज सिंह यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.
ट्विटमध्ये ते म्हणाले की, कलम 370 आणि 35 अ हे रद्द केल्यानंतर आयएसआय प्रायोजित कट्टरतावादी दिल्लीचे रुपांतर काश्मीरमध्ये करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शाहीन बाग आणि जाफराबाद येथील आंदोलने पाकिस्तानचीच चाल असल्याचे गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.
नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात शनिवारी रात्री जाफराबाद मेट्रो स्टेशन भागात 1 हजारहून अधिक लोक एकत्र आले होते. यामध्ये महिलांचा सहभाग अधिक होता. "नो एनआरसी" असा संदेश असलेल्या टोप्या परिधान करून आंदोलक गोळा झाले होते. यावेळी आंदोलकांच्या हातात तिरंगा झेंडा होता. नागरिकता संशोधन कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
याआधीही डिसेंबर महिन्यात देखील तिरंगा झेंडा हाती घेऊन सीएए कायद्याचा विरोध करण्यासाठी हजारो लोक जाफराबाद येथे मोठ्या संख्येने जमले होते.