ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - जीना हाऊस पाडण्याची मागणी होताच पाकिस्तानने जिना हाऊसवर आपला मालकी हक्क सांगितला आहे. जीना हाऊसवर पाकिस्तानचा हक्क असून, पाकिस्तान सरकारच्या मालकी हक्काचा भारताने आदर करावा असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जीन हाऊस ही पाकिस्तानसाठी ऐतिहासिक संपत्ती असून, भारताने ती आमच्याकडे सुपूर्द करावी असे "द एक्सप्रेस ट्रीब्युन"ने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
दक्षिण मुंबईतील भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी जीना हाऊस पाडण्याची मागणी केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. जीना हाऊसमध्ये फाळणीचा कट रचला गेला. जीना हाऊस फाळणीचे चिन्ह आहे. त्यामुळे ही वास्तू पाडली पाहिजे असे वक्तव्य मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी केले होते. लोढा यांनी केलेली मागणी तर्कविसंगत आणि निरर्थक असल्याचे पाकिस्तानी जनतेचे मत आहे असे द एक्सप्रेस ट्रीब्युनने म्हटले आहे.
दक्षिण मुंबईतील जीना हाऊस हे पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांचे निवासस्थान होते. भारताने पाकिस्तान सरकारच्या मालकी हक्काचा आदर केला पाहिजे. भारत सरकार या संपत्तीचे संरक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडेल अशी अपेक्षा आहे असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
जीना हाऊससंबंधी पाकिस्तानची भारताबरोबर चर्चा झाली होती. भारताने ही संपत्ती ताब्यात देण्याचे आश्वासन दिले होते पण अजूनही आपला शब्द पाळलेला नाही असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झाकरीया यांनी सांगितले.
नुकताच शत्रू संपत्ती कायदा मंजूर झाला आहे त्यामुळे जीनाच्या वारसदारांना संपत्तीवर दावा सांगता येणार नाही असे लोढा म्हणाले. 14 मार्चला मंजूर झालेल्या शत्रू संपत्ती कायद्यानुसार फाळणीच्यावेळी ज्यांनी पाकिस्तान आणि चीनमध्ये स्थलांतर केलेय त्यांना भारतातील संपत्तीवर कायद्याने हक्क सांगता येणार नाही.