जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर जम्मू क्षेत्रात शनिवारी रात्रभर १५ भारतीय चौक्या आणि गावांवर गोळीबार केला. या गोळीबारात तिघे जण जखमी झाले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) त्यास चोख प्रत्युत्तर दिल्याने उभय बाजूंनी अजूनही धुमश्चक्री सुरूच आहे. बीएसएफ प्रवक्त्याने रविवारी सांगितले, पाकिस्तानी रेंजर्सनी रात्रभर जम्मू जिल्ह्णाच्या अरनिया आणि आरएस पुरा सेक्टरमध्ये १५ चौक्यांना लक्ष्य बनवून तुफान गोळीबार केला. रात्री ९ वाजून १० मिनिटांनी अरनिया क्षेत्रातील तीन चौक्यांवर उखळी तोफांचा मारा करण्यात आला. एवढेच नाही तर या क्षेत्रातील काही गावांनाही लक्ष्य बनविण्यात आले. यात आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या जाबोवाल गावातील एक नागरिक गंभीर जखमी झाला. याशिवाय कुकू-दा कोठे, महाशा कोठे, त्रेवा, चिंगिया, अल्ला, सी, चिनाज आणि देवीगड गावांवरही हल्ला करण्यात आला. सांबा, रामगड, हिरानगर आणि कठुआ भागातून मात्र गोळीबाराचे वृत्त नाही.पूंछमध्ये नियंत्रण रेषेलगतच्या शाहपूर, किरनी, बनवंत, मंडार, कालसाम, डोडा येथील लोकवस्तीवर पाककडून तुफान गोळीबार करण्यात आला. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानचे दु:साहस
By admin | Published: October 13, 2014 3:00 AM