नवी दिल्ली : उभय देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीच्या तोंडावर काश्मीरमधील फुटीरवाद्यांना गोंजारण्याची आगळीक पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज रविवारी दिल्लीत येतील, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांना निमंत्रित करण्याची कुरापत पाकिस्तानने पुन्हा काढली आहे. याविषयी भारताने नाराजी व्यक्त केली असली तरी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि सरताज अझीज यांच्यातील बैठक ठरल्याप्रमाणे होण्याचे संकेत आहेत.गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात परराष्ट्र सचिवांच्या पातळीवरील चर्चा दिल्लीत व्हायची होती. त्याच्या पूर्वसंध्येस पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी काश्मिरी फुटीरवाद्यांना भेटीसाठी बोलावून त्यांच्याशी सल्लामसलत केली होती. हे कृत्य पूर्णपणे अमान्य असल्याचे सांगत भारताने ती बैठक ऐनवेळी रद्द केली होती. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ठामपणे असे सांगितले होते, की तुम्ही एक तर आमच्याशी बोला किंवा फुटीरवाद्यांशी बोला, असे पाकिस्तानला ठणकावून आम्ही लाल रेषा आखली आहे. आता सरताज अझीज यांच्या भेटीच्या वेळीही पाकिस्तानने ही लाल रेषा ओलांडण्याची कुरापत काढली आहे. परंतु त्यामुळे गेल्या वेळेप्रमाणे नियोजित बोलणी रद्द होण्याची शक्यता दिसत नाही. कारण रविवारी आधी दोवाल-अझीज बोलणी होणार आहेत व त्यानंतर काश्मिरी फुटीरवादी नेते अझीज यांना भेटण्यासाठी जाणार आहेत.सरकारी सूत्रांनी सांगितले की, भारत व पाकिस्तान यांच्यात बोलणी होऊ नयेत, असे वाटणाऱ्या पाकिस्तान सरकारमधील एका वर्गाकडून अशा भारतविरोधी कारवाया नेहमीच केल्या जात असतात. आता काश्मिरी फुटिरवाद्यांना दिले गेलेले निमंत्रण हाही त्याचाच एक भाग आहे. या चिथावणीने भारताने सुरक्षा सल्लागारांची बैठक रद्द करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.पाकिस्तान उच्चायोगाने मंगळवारी रात्री फोन करून हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांना निमंत्रण दिले. हुर्रियतचे कट्टरवादी नेते सैयद अली शाह गिलानी यांना अझीज यांना भेटण्यासाठी निमंत्रण दिले गेले आहे तर मिरवैज उमर फारूख यांच्यासारख्या मवाळ नेत्यांना पाकिस्तानी उच्चायोगात अझीज यांच्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या स्वागत समारंभासाठी निमंत्रित केले गेले आहे. यास दुजोरा देताना हुर्रियतचे प्रवक्ते अय्याज अकबर म्हणाले की, (पाकिस्तान) उच्चायोगाकडून गिलानीसाहेबांना निमंत्रण आले आहे. भारतासोबत बंद पडलेली बोलणी पुन्हा सुरु करण्यापूर्वी पाकिस्तानला फुटिरवाद्यांनाही विश्वासात घ्यायचे आहे. स्वत: मीरवैज फारूक यांनीही इतर हुर्रियत नेत्यांसोबत आपण अझीज यांना भेटायला जाणार असल्याचे सांगितले.पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री किंवा अन्य उच्चपदस्थ भारतात येतात तेव्हा त्यांनी काश्मिरमधील फुटिरवादी नेत्यांना भेटीसाठी बोलावणे किंवा या नेत्यांनी स्वत:हून त्यांना जाऊन भेटणे हे नवे नाही. पण नरेंद्र मोदींचे उजव्या विचारसरणीचे सरकार दिल्लीत सत्तेवर आल्यानंतर भारताने यावर प्रथमच खंबीर भूमिका घेत गेल्या वर्षी परराष्ट्र सचिवांची चर्चा रद्द केली होती. तेव्हापासून बंद पडलेली द्विपक्षीय चर्चेची प्रक्रिया दोवाल-अझीज भेटीने पुन्हा सुरु होत असतानाच पाकिस्तानाने पुन्हा कुरापत काढल्याने भारत सरकार नेमकी काय पावले उचलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)————————-कोटभारत आणि पाकिस्तान यांनी आपसात चर्चा सुरु ठेवणे महत्वाचे आहे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे पाकिस्तान उच्चायोगाकडून आम्हाला आलेल्या निमंत्रणाचे प्रसिद्धी माध्यमे व विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, एवढीच विनंती आहे.-मिरवैज उमर फारूक, अध्यक्ष, हुर्रियत कॉन्फरन्स———भारत आणि पाकिस्तान यांच्यात न सुटलेले असे अनेक प्रश्न आहेत व काश्मीर समस्या त्यापैकी प्रमुख आहे. काश्मीरच्या फुटिरवादी नेत्यांशी आम्ही आधीपासूनच भेटत आलो आहोत. हे आम्ही कधी लपवून ठेवलेले नाही. तुम्ही याला चिथावणीखोर का म्हणता कळत नाही. आम्ही याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. काश्मीरच्या संदर्भात हुर्रियत नेते हाही महत्वाचा घटक असल्याने त्यांच्याशी बोलणे आम्हाला महत्वाचे वाटते.-अब्दुल बासित, भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त
पाकची कुरापत, तरीही होणार भेट
By admin | Published: August 20, 2015 1:30 AM