- दत्तात्रय शेकटकर(निवृत्त लेफ्टनंट जनरल)मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, निर्णयक्षमता व कूटनीती या बाबी परराष्ट्र धोरण राबविताना महत्त्वाच्या असतात. त्यांचा मेळ घालून १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात दक्षिण आशिया खंडाचा नकाशा इंदिरा गांधी यांनी बदलला. बांगलादेशाची निर्मिती केली. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर त्यांनी आखलेल्या मुत्सद्दी धोरणामुळेच १४ दिवसांत भारताने पाकिस्तानला नमवले.मी १९६३मध्ये लष्करी सेवेत रुजू झालो. त्या वेळी नेहरू पंतप्रधान होते. स्वातंत्र्यलढ्यातील कठीण प्रसंग इंदिराजींनी पाहिले होते; त्यांना स्वातंत्र्याची जाणीव होती. नेहरूंचे संस्कार असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर बनले. त्या अनुभवाचा वापर त्यांनी भारताचे संरक्षण, प्रगती व विकासासाठी केला.पश्चिम पाकिस्तान पूर्वेकडील बंगाली जनतेवर अन्याय करीत होता. तेथील नागरिकांना हक्क मिळावेत, याचा निर्धार इंदिरा गांधी यांनी केला. देश चालवायचा असेल, तर राष्ट्रनीती व आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही अभ्यास करावा लागतो. इंदिरा गांधींमध्ये हे गुण होते. त्यांनी पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले. मुक्ती वाहिनीच्या आंदोलकांना प्रशिक्षित करण्याचे काम भारतीय गुप्तचर संस्थांनी सुरू केले. त्यात माझाही सहभाग होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी पाकविरोधी आघाडी सुरू केली. अमेरिका, सोव्हिएत रशिया, फ्रान्स, ब्रिटन या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी त्यांनी घेतल्या व पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले.भारताशी पाकिस्तान युद्ध करेल, याचे संकेत मिळाले होते. मे-जूनच्या सुमारास युद्ध होईल, अशी शक्यता होती. ते भारताच्या हिताचे नव्हते. भौगोलिक व आंतरराष्ट्रीय स्तराबरोबरच हवामान योग्य नव्हते. युद्ध झाले असते, तर आज बांगलादेश अस्तित्वात नसता. त्यांनी लष्करप्रमुख जनरल माणेकशा यांना बोलावले. परिस्थितीचा आढावा घेतला. माणेकशा यांनीही तो इंदिराजींसमोर मांडला. येथे इंदिराजींच्या मुत्सद्दी धोरणाचा व दूरदृष्टीचा प्रत्यय आला. इंदिराजींना युद्ध लवकर संपवायचे होते. कारण, आंतरराष्ट्रीय दबाव वाढत होता. माणेकशा यांनी माहिती दिली. काही अवधी मागितला. इंदिराजींनी माणेकशा यांना अवधी व स्वातंत्र दिले. माणेकशा यांनी लष्करी तयारी, तर इंदिराजींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू सांभाळली. अमेरिका पाकला युद्धात मदत करणार, हे उघड होते. याला शह देण्यासाठी त्यांनी सोव्हिएत रशियाशी करार केला. याचा उपयोग झाला. इंदिराजीच्या धोरणामुळे हे युद्ध भारतीय लष्कर १४ दिवसांत जिंकू शकले.पंतप्रधानांना दोन आघाड्यांवर हे युद्ध लढावे लागले. कमी दिवसांत युद्धाचा निकाल लावायचा होता. पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करायचे होते. पश्चिम भागात पाकिस्तान भारतावर आक्रमण करेल, हे त्यांना माहीत होते. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानचे डाव हाणून पाडले. युद्धाच्या १२ दिवसांत पाकिस्तान शरणागती पत्करेल, हे समजले, तेव्हा त्यांनी बांगलादेशचे भारतात विलीनीकरण केले नाही. मोठेपणा दाखवून पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला आणि मुजिबुर रेहमान यांच्याकडे त्या देशाची सूत्रे सोपवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली.पाकिस्तानच्या भूमीवर लढून ९८ हजार पाक सैनिकांना भारताने युद्धकैदी बनवले. पण त्यांना वाºयावर सोडले नाही. त्यांना बांगलादेशात ठेवले असते, तर तेथील नागरिकांनी त्यांना ठार केले असते. हे माहीत असल्याने इंदिराजींनी सर्व युद्धकैद्यांना भारतात आणले. दोन वर्षे त्यांना सांभाळले. या युद्धात पाकिस्तानची हानी भारताने केली. पश्चिम पाकमधील मोठा भूभाग भारताने जिंकला. सुपीक प्रांतातील ३५० गावे भारताच्या ताब्यात होती. पुढे सिमला करार झाला. युद्धकैद्यांना परत पाठविताना भारतीय भूभाग व काश्मीरमधील ताबा देण्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार भुट्टो यांनी मान्य केले. मात्र, त्यांनी शब्द पाळले नाहीत. इंदिराजींचे व्यक्तिमत्त्व एवढे मोठे होते, की त्यांनी शत्रूवरही विश्वास दाखविला. १९७१च्या युद्धातील यश हे केवळ इंदिराजींचे नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी यामुळेच मिळाले.
(शब्दांकन : निनाद देशमुख)