नवी दिल्ली - गुरुवारी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केवळ देशाचीच नव्हे तर शेजारच्या पाकिस्तानचीही नजर या निकालांकडे आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात सत्तांतर होणार की मोदींची सत्ता कायम राहणार याची उत्सुकात पाकिस्तानी नागरिक आणि उच्चपदस्थामध्ये आहे. त्यातही भारतात पुन्हा मोदींची सत्ता येऊ नये, असे अनेक पाकिस्तानी नागरिकांना वाटते. काही महिन्यांपूर्वी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हद्दीत घुसून केलेली एअरस्ट्राइक हे त्यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानी नागरिक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या पुन्हा सत्तेत येण्याबाबतचे मत तेथील वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. तसेच अनेक पाकिस्तानी नागरिकांकडून सोशल मीडियावरही भारतातील निवडणुकांसंदर्भातील पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यासंदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने प्रसारित केले आहे.
पुन्हा मोदींचीच सत्ता येण्याचा संकेतांमुळे पाकिस्तानात अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 10:44 IST