नवी दिल्ली : पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर भारतीय हवाईदलाने चढविलेल्या हल्ल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी भारतावर हल्ला केला होता. यावेळी पाकिस्तानने एफ-16 ही विमाने भारतीय हद्दीत घुसविली होती. त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या भारताच्या लढाऊ विमानांवर पाकच्या पायलटनी 40 ते 50 किमीवरून 4-5 एम्राम मिसाईल डागल्याचा दावा करण्यात आला आहे.
वृत्तसंस्था एनआयने दिलेल्या वृत्तानुसार 27 फेब्रुवारीला पाकिस्तानची तीन एफ-16 विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. यावेळी भारताच्या मिग-21 बायसन आणि सुखोई-30 या विमानांनी त्यांना रोखण्यासाठी हवेत झेप घेतली. यावेळी पाकिस्तानच्या पायलटांनी या विमानावर हवेतून हवेत मारा करता येणारी अमेरिकन बनावटीची एम्राम ही मिसाईल डागली होती. इलेक्ट्रॉनिक संकेतांनुसार 4 ते 5 मिसाईल जवळपास 50 किमी लांबवरून डागण्यात आली होती. पाकिस्तानच्या हल्ल्याद्वारे भारताचे ब्रिगेडचे मुख्यालय, सेनेचे मुख्यालय आणि लष्करासाठी इंधन साठविण्यात येणारा ऑईल डेपो उडवून देण्यात येणार होते.
या मिसाईलचे भाग शोधण्याचे काम लष्कराकडून सुरु आहे. पाकिस्तान पुरावे सापडूनही भारताविरोधात एफ-16 चा वापर केला नसल्याचा दावा करत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच या मिसाईलचे भाग सापडले असून हा पुरावा अमेरिकेला देण्यात येणार आहे. अन्य मिसाईचे भागही शोधण्याचे काम सुरु आहे. पाकिस्तानच्या विमानांनी डागलेली मिसाईल लक्ष्यभेद करण्यास अपयशी ठरली होती. यामुळे या मिसाईलचे अवशेष सापडल्यास पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत.
27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या विमानांना रोखताना भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-21 विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते. त्यांना पाकिस्तानने पकडले होते. तीन दिवसांनंतर अभिनंदन यांना भारताकडे सोपविण्यात आले होते. या काळातही पाकिस्तानचा काळा चेहरा समोर आला आहे. अभिनंदन यांना 24 तास झोपू दिले नव्हते. तसेच मारहाणही करण्यात आली होती. यानंतर सोडताना अभिनंदन यांच्याकडून पाकिस्तानी लष्कराचे गुणगान करतानाचा व्हिडिओ काढून माध्यमांमध्ये पसरविला होता.
1 मार्चला अभिनंदन यांची सुटका झाली. वाघा बॉर्डरवरुन ते मायदेशी परतले. त्यावेळी त्यांचं एखाद्या नायकाप्रमाणे जल्लोषात स्वागत झालं. यानंतर त्यांना उपचारांसाठी सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनंदन लवकरच कॉकपिटमध्ये परतावेत, अशी इच्छा सैन्यातील अधिकाऱ्यानी बोलून दाखवली आहे.