जम्मू - काश्मीर : पाकिस्तानचा (Pakistan) मोठा कट सुरक्षा दलाने हाणून पाडला आहे. ड्रोनमधून IED बॉम्ब टिफिन बॉक्समध्ये ठेवून पाठवला जात होता. ड्रोन पाहून सुरक्षा दलांनी लटकलेल्या वस्तू काळजीपूर्वक खाली काढल्या. त्यानंतर तो आयईडी बॉम्ब (IED Bomb) असल्याचं निष्पन्न झालं. अशा प्रकारे पाकचा नापाक डाव उधळून लावण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून काश्मीर भागात ड्रोनचा वापर करत टिफिन बॉक्समधून टाईम बॉम्ब पाठवण्यात आले होते. पण बीएसएफने (BSF) हा डाव उधळत बॉम्ब निष्क्रिय केले आहेत.
सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कानाचक परिसरात बीएसएफला (BSF) ड्रोन दिसले. जवानांनी त्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर लगेचच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ड्रोनला जोडलेले पेलोडमध्ये मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये पॅक केलेले तीन चुंबकीय आयईडी बॉम्ब होते. या बॉम्बमध्ये टाइमर वेगवेगळ्या वेळेसाठी सेट केला गेला होता. हे आयईडी बॉम्ब निष्क्रिय करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा ड्रोन हवेत सुमारे ८०० मीटर उंचीवर उडत होता. याआधी कठुआ जिल्ह्यातही बीएसएफनं एक ड्रोन खाली पाडला होता. त्यामध्ये स्फोटकं सदृश्य वस्तू आढळली होती. स्थानिकांना हे संशयित ड्रोन आढळुन आले होते.