ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १८ - जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार आजही चालू राहिला. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताच्या दोन जवानांना वीरमरण आले, तर एक जवान जखमी झाला. तर भारतील लष्कराने केलेल्या गोळीबारात एक घुसखोर ठार झाला.
लष्तराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमधील गुरेज विभागातून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला. जवानांनी केलेल्या गोळीबारात एक घुसखोर ठार झाला. तसेच पाकिस्तानी सैनिकांनी राजौरी, पुंछ, कुपवाडा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गोळीबार केला. लष्कराकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबारामुळे राजौरी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला. तर राजौरीमधील नौशेरा विभागात लष्कराचा एक जवान शहीद झाला. जसप्रीत सिंह असे त्याचे नाव असून, तो पंजाबमधील राहणारा होता. तर नौगाम विभागातही एका जवानाला वीरमरण आले.
भारताचा जवान शहीद, मुलीचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू असून, राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचा एक जवान शहीद झाला. नायक मुद्दसर अहमद शहीद झाले असून, दुसरीकडे बालाकोट सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात एक नऊ वर्षांची मुलगी ठार झाली.
नायक मुद्दसर अहमद हे काश्मीरचे असून, त्यांच्यामागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. अतिशय प्रामाणिक जवान आम्ही गमावला आहे, असे लष्कराने म्हटले. पाकच्या गोळीबारात मरण पावलेली सजदा हौसर ही अवघ्या नऊ वर्षांची मुलगी बारोटी गावची आहे. याशिवाय तेथील दोन रहिवासी जखमी झाले आहेत.