पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. त्यासाठी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून नोटीसही जारी करण्यात आलं आहे. देशातील लष्कर आणि सुरक्षा संबंधी राजधानी इस्लामाबाद येथे ही तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक तळं नेस्तनाबूत केली आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड हालचालींना वेग आला आहे.
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. त्यानंतर दोन्ही देशातील सरकारी यंत्रणांकडून वेगाने पुढील हालचाली सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तात्काळ बैठक बोलावली असून कॅबिनेट मंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. तर, तिकडे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्रीही बैठक घेत आहेत. पाकिस्तानला संपविण्याचे भारतीयांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाल्याचेही कुरेशी यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तानी लष्कराकडूनही भारतीय हल्ल्याला एकप्रकारे दुजोरा देण्यात आला आहे. भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचंही पाकिस्तानी सैन्यानं म्हटलंय. दरम्यान, संरक्षण खात्याकडून सीमारेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.