नवी दिल्ली- काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीइम्रान खान पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अभिनंदन करणारं पत्र लिहिलं होतं. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींनी काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्याचं निमंत्रण दिल्याचं सांगितलं होतं. परंतु त्यांचा हा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानंच फेटाळून लावला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पत्रातून मोदींनी इम्रान खान यांचं अभिनंदन केलं, तसेच दोन देशांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करावी, असं पत्रात नमूद असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, पक्षाकडे बहुमत नव्हते. शुक्रवारी सहयोगी पक्षांच्या मदतीने या पक्षाने आपले मताधिक्य संसदेत दाखवले. यावेळी इम्रान खान यांना 176 मते मिळाली तर पाकिस्तान मुस्लीम लीगचे उमेदवार शाहबाज शरीफ यांना 96 मते मिळाली.