पालनपूर (गुजरात) : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे, असा आरोप करत, पाकिस्तानच्यानेत्यांची भेट घेणा-या काँग्रेस नेत्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.पालनपूर येथील एका सभेत बोलताना मोदी म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक सरदार अर्शद रफीक यांनी अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचे आवाहन केले आहे. याचा अर्थ काय? ते म्हणाले की, काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानी नेत्याशी चर्चा केल्याच्या एका दिवसानंतर आपल्याला ‘नीच’ म्हटले होते.मोदी म्हणाले की, मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत मीडियात वृत्त होते. या बैठकीस पाकिस्तानचे उच्चायुक्त, पाकिस्तानचे माजी विदेश मंत्री, भारताचे माजी उपराष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित होते. अय्यर यांच्या निवासस्थानी तीन तास ही बैठक चालली. त्याच्या दुस-याच दिवशी अय्यर म्हणाले की, मोदी नीच आहेत. हे गंभीर प्रकरण आहे. अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनविण्याचे समर्थन रफीक यांनी केले होते. मोदी म्हणाले की, एकीकडे पाकिस्तानी सैन्याचे माजी डीजी गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानचे लोक मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर गुजरातमधील जनता, मागास वर्ग, गरीब लोक आणि मोदी यांचा अपमान केला जात आहे. काँग्रेसने देशाच्या जनतेला हे सांगायला हवे की, काय योजना आखली जात आहे.
गुजरात निवडणुकीत पाकचा हस्तक्षेप, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 2:05 AM