ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 12 - जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी लष्कराने सकाळी 6.20 च्या सुमारास पूँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबार सुरु केला अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.
भारतीय लष्कर पाकिस्तानच्या या आगळीकीला सडेतोड उत्तर देत असून अजूनही गोळीबार सुरु आहे. 24 तासात पाकिस्तानने दुस-यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारत सरकार आज पाकिस्तानच्या 11 कैद्यांची सुटका करणार असताना पाकिस्तानने पुन्हा एकदा नापाक हरकत केली आहे.
रविवारी पाकिस्तानी लष्कराने राजौरी आणि सांभा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील ठिकाणांवर गोळीबार आणि तोफांच्या मारा केला. भारतीय सैन्याने त्यावेळी सुद्धा चोख प्रत्युउत्तर दिले होते. पाकिस्तानच्या लष्कराने राजौरी जिल्ह्यात नौशेरा क्षेत्रात नियंत्रण रेषेवर १२.४० वाजता छोट्या शस्त्रांतून बेछूट गोळीबार केला, जड स्वयंचलित तोफांचा मारा केला, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.सांभा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत सीमा सुरक्षा दलांवर गोळीबार केला, असे बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
बीएसएफनेही त्याचा चोख प्रतिकार केला. घुसखोरीविरोधातील कारवाईत लष्कराने शुक्रवारी पाच अतिरेक्यांना ठार मारले. उरी क्षेत्रात नियंत्रण रेषेवर ही कारवाई झाली. हे अतिरेकी ‘फियादीन’ तुकडीतील होते व त्यांचा आत्मघाती हल्ल्यांचा प्रयत्न होता. झडतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दारुगोळा व शस्त्रे जप्त करण्यात आली.
जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष यासिन मलिक मोहम्मद यासिन मलिक यांना रविवारी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात स्थानबद्ध करण्यात आले. शांततेचा भंग होईल या भीतीतून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने दगाबाजी सुरु असताना भारत सरकार सोमवारी सदिच्छा हेतूने 11 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करणार आहे. कझाकस्तान येथे शांघाय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यामध्ये झालेल्या अनौपचारिक भेटीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.