श्रीनगर - पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अणुबॉम्बवरुन केलेल्या विधानावर टीका करताना पुन्हा बरळल्या आहेत. राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना भारताने अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेत का असं विधान केलं होतं. त्यावर टीका करताना मेहबुबा यांनी पाकिस्ताननेही अणुबॉम्ब ईदसाठी ठेवले नाहीत असं वादग्रस्त विधान केलं आहे.
मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करत सांगितले आहे की, भारताने दिवाळीसाठी अणुबॉम्ब ठेवले नाही तसेच पाकिस्तानकडूनही अणुबॉम्ब ईदसाठी ठेवले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशाप्रकारे विधान करुन सार्वजनिक चर्चेची पातळी खालावत आहेत अशी टीका केली.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असताना मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपलेला आहे. मागील काही दिवसांपासून सर्व प्रचार दहशतवाद, पाकिस्तान आणि देशाची सुरक्षा अशा मुद्द्यांवर गाजताना दिसत आहे. पाकिस्तान आत्तापर्यंत अणुबॉम्बची भीती दाखवत होता, ती भीती आम्ही दूर केली. आमच्याकडची शस्त्रास्त्रे ही काही फक्त दिवाळीसाठी नाहीत अशा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या सभेत दिला होता.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले होते की, आत्तापर्यंत कायम पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती दाखवली जात होती. पाकिस्तानही कायम म्हणत असे की आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत म्हणून. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे तर मग भारताकडे जे आहेत ते काय फक्त दिवाळीसाठी आहेत का असा सवाल त्यांनी केला.
याआधीही जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जर भाजपाने कलम 370 रद्द केलं तर जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करु असा इशारा मुफ्ती यांनी दिला होता. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती बरळल्या होत्या. ज्या अटींवर जम्मू काश्मीर भारताचा एक भाग बनलं जर त्याच अटी काढून घेणार असाल तर आम्हाला जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करावं लागेल. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी 2020 पर्यंत जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि अनुच्छेद 35 ए रद्द करण्याची घोषणा केली त्यावर मुफ्ती यांनी हे विधान केले होते.