नवी दिल्ली : पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ने भारतातील पंजाब आणि आसपासच्या राज्यांतील रेल्वे ट्रॅक उडवून देण्याचे मोठे कटकारस्थान रचले आहे, असा सतर्कतेचा इशारा गुप्तचर संस्थांनी जारी केला आहे. हा कट तडीस नेण्यासाठी आयएसआयने दहशतवादी एजंटांचा गुप्त गट (स्लीपर सेल) सक्रिय केला आहे, असे गुप्तचर संस्थांनी इशाऱ्यात म्हटले आहे.
पाकिस्तानची संस्था आयएसआय भारतातील आपल्या हस्तकांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी मोठी रक्कम देत असून, मालगाड्यांची वर्दळ असलेले रेल्वे ट्रॅक्स उडवून देण्याचा त्यांचा कट आहे. आयएसआयचा तालिबानच्या नावावर मोठा घातपात करण्याचा बेत आहे. यासाठी अफगाणिस्तानात लुटलेल्या अमेरिकी शस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमधील रेल्वे ट्रॅकच्या आसपासची सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.
म्हणून पंजाब निशाण्यावर
आयएसआय जम्मू-काश्मीरमध्ये यशस्वी न झाल्याने त्यांनी पंजाबकडे लक्ष वळविले आहे. सुरक्षा दलाने गोळा केलेल्या पुराव्यातून भारतविरोधी घटक पंजाबमधील सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे.