नवी दिल्ली - दिवाळीला भारतात दहशतवादी हल्ले करण्याचा कट पाकिस्तान आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सुत्रांकडून मिळाली आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू काश्मीरमधील सीमारेषा परिसरात गुलमर्ग येथून दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. झाकीर मुसासहित 12 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असल्याची सूचना गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. लष्करी कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्याचा आणि काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा कट आखण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी दोन दिवसांपुर्वी नियंत्रण सीमेवर मीटिंग केली. यावेळी भारतावर हल्ल्याचा कट आखण्यात आला.
झाकीर मूसा हा जम्मू काश्मीरच्या अल-कायदा युनिटचा प्रमुख आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झाकीर मुसाने अल-कायदाशी संबंधित जज्बात-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेच्या अन्य चौघांसोबत मीटिंग केली. बडगाम जिल्ह्यात ही मीटिंग झाली. यावेळी त्याने दहशतवाद्यांनी मोबाइलचे सीम कार्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे. गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट दिल्याने सुरक्षा यंत्रण सज्ज झाल्या असून, देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
23 वर्षीय झाकीर मूसा याने काही महिन्यांपुर्वी हिजबूल मुजाहिद्दीनची साथ सोडत 'गजवा-ए-हिंद'मध्ये (अल कायदाची दहशतवादी संघटना) सामील झाला होता. आपण दहशतवादी संघटनेचा प्रमुख असल्याचा दावा तो करत आला आहे. झाकीर मुसाने हिजबूलची साथ सोडताना सांगितलं होतं की, 'फुटीरवादी संघटना हुर्रियत कॉन्फरन्स काश्मीरला राजकीय समस्सा सांगत सामान्य लोकांना फासावर लटकवत आहे'.
याचवर्षी जुलै महिन्यात अल कायदाने झाकीर मुसा 'गजवा-ए-हिंद'चा प्रमुख असेल अशी घोषणा केली होती. काश्मीरला मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी जिहादचा झेंडा फडकावणं गरजेचं आहे. यासाठी झाकीर मुसाकडे सुत्रं सोपवण्यात आली आहेत असं अल कायदाने सांगितलं होतं.
बकरी ईदच्या आधी झाकीर मुसाने भारताला गोभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूपासून मुक्त करणार असल्याची धमकी दिली होती. बकरी-ईदच्या आधी झाकीर मुसाने 10 मिनिटांचा ऑडिओ मेसेज जारी करत ही धमकी दिली होती. 'गोभक्त नरेंद्र मोदी राजकारण आणि डिप्लोमसी करत लोक जमा करु शकतात, मात्र ते आम्हाला थांबवू शकत नाहीत. आम्ही भारतात इस्लामचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही', असं झाकीर मुसा बोलला होता.