मुंबई : जगातील प्रसिद्ध सर्च इंजिन गुगलवर सध्या भिकारी हा शब्द चांगलाच प्रचलित झाला आहे. हा शब्द टाकल्यास पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो येत आहे. यामुळे पाकिस्तान चिडला असून भारतीय वंशाचे गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांना नोटिस पाठविण्याची तयारी केली आहे.
काही शोधायचे असल्यास गुगलवर पहिली धाव घेतली जाते. वेगवेगळ्या भाषेतून एखादा शब्दप्रयोग केलेला असला तरीही त्याचे भाषांतर करून शोधणाऱ्याला त्याला हवे ते दाखविले जाते. यामुळे हा शब्द जगाच्या कोणत्याही भाषेत गुगलवर टाकल्यास तो शब्द वापरल्या गेलेल्या वस्तू, ठिकाण किंवा व्यक्तीचा फोटो येतो. याआधी गुगलवर फेकू नावाने सर्च केल्यास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो येत होता. तर 'इडियट' हा शब्द सर्च केल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येतो.
पाकिस्तान सध्या आर्थिक चणचणीत सापडला आहे. चीनकडून घेतलेले वारेमाप कर्ज फेडणे अवघड बनले आहे. दहशतवाद्यांना मदत करत असल्याने अमेरिकेनेही मदतनिधी रोखला आहे. अशा पेचात सापडल्याने पाकिस्तानचे दिवाळे निघाले आहे. यामुळे इम्रान खान यांनी अधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्याही विक्रीस काढल्या आहेत. तसेच जिथून मिळेल तिथून मदत घेण्यासाठी ते हात पसरवत आहेत. यामुळे त्यांची इंटरनेटवर भिकारी अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. यामुळे गुगलवर हा शब्द टाकल्यास त्यांचा फोटो येत आहे.
याविरोधात पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या विधानसभेमध्ये प्रस्ताव आणण्यात आला असून गुगलला समन्स पाठविण्यात येणार आहे. यामध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांना विचारण्यात आले आहे की भिकारी सर्च केल्यावर इम्रान खान यांचा फोटो का येतो?