ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - सीमारेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले. या शहिदांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्याच्या नॉर्दर्न कमांडकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पाकिस्तान विनाकारण ही कृती करत असून याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. पाकिस्तानकडून कृष्णा घाटी सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत असताना यात दोन जवान शहीद झाले. यादरम्यानच शहिदांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. सोमवारी सकाळी जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्ण घाटीमधील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले.
दरम्यान, 27 एप्रिल रोजी काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पंझगाम येथील लष्करी तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका कॅप्टनसह तीन जवान शहीद, तर पाच जण जखमी झाले. लष्कराने केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन अतिरेकी ठार झाले होते.
यावेळी स्थानिकांनी जमाव जमवून दगडफेक सुरू केल्याने सुरक्षा दलांच्या कारवाईत अडथळे येत होते. त्यामुळे सुरक्षा दलांना जमावावर कारवाई करावी लागली होती. यात जखमी झालेल्या एका नागरिकाचा सायंकाळी मृत्यू झाला होता. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दहशतवाद्यांनी पंझगाम येथील लष्करी छावणीवर पहाटे 4 वाजता हल्ला केला. ही छावणी येथून 100 कि.मी. अंतरावर आहे. या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह तीन लष्करी जवान शहीद झाले. चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्तान घातले, असे लष्करी प्रवक्त्याने सांगितले. कॅप्टन आयुष, असे शहीद अधिकाऱ्याचे नाव आहे. उर्वरित दोन जवानांची नावे समजू शकली नाहीत. या हल्ल्यात इतर पाच जवान जखमी झाले आहेत.
अंद्राबी यांना अटक
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फुटीरवादी नेत्या आसिया अंद्राबी यांना गुरुवारी अटक केली. त्यांनीच खोऱ्यातील महिलांना सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यास कथितरीत्या चिथावणी दिल्याचा आरोप आहे.