ऑनलाइन लोकमतजेनेव्हा, दि. 2 - भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात खडे बोल सुनावले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं प्रतिनिधित्व करत असलेले भारतीय राजदूत अजित कुमार यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा बनला असून, भारताविरोधात कुरघोडी करण्यासाठी दहशतवादी संघटनांना जन्म देतो आहे. त्यामागे भारतातली शांती भंग होऊन देशाचं विकासावरचं लक्ष्य हटवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. गेल्या दोन दशकांपासून पाकिस्तान सर्वाधिक खरतनाक दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना पोसतो आहे. पाकिस्तानमध्ये सद्य स्थितीत दहशतवाद्यांना निर्माण करणा-या संघटनांच्या म्होरक्याचाच हे दहशतवादी खात्मा करत आहेत. पाकिस्ताननं भारतासोबत काश्मीर मुद्द्यावर बोलण्याआधी पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडावा, त्यानंतरच चर्चेला यावं, असंही अजित कुमार म्हणाले आहेत. पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन करत लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करत आहे. तसेच पाकिस्ताननं लवकरात लवकर पाकव्याप्त काश्मीर खाली केलं पाहिजे. काश्मीरमध्ये उसळणा-या हिंसाचाराला सर्वस्वी सीमेपलीकडेचा दहशतवाद आणि पाकिस्तानचं जबाबदार असल्याचंही ते म्हणाले आहेत. पाकिस्तान निर्दयीपणे मानवाधिकारांचं उल्लंघन करत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान स्वतःच्या प्रांतातील बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तूनख्वासह उत्तर पश्चिम भागातील लोकांवर संकोच न करता दहशतवादी कारवाया करत असून, हवाई हल्लेही करत आहे. स्वतःच्याच देशात धार्मिक आणि सांप्रदायिक दंगे घडवत असल्यानं पाकिस्तान या देशाचं रुपांतर आता जागतिक दहशतवादी देशामध्ये झालं आहे. उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. पाकिस्ताननं 2016 या वर्षांत जवळपास 151 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे, अशी माहिती त्यांनी संयुक्त राष्ट्रात दिली आहे.
पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा- भारत
By admin | Published: March 02, 2017 7:17 AM