पुंछ/वाघा : एकीकडे वाघा सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना (बीएसएफ)मिठाईचे वाटप करायचे, आणि दुसरीकडे पुंछमध्ये गोळीबार करायचा असे पाकिस्तानचे दुटप्पी धोरण समोर आले असून, स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी पाकिस्थाने पुंछमध्ये सीमा नियंत्रण रेषेपलीकडून जोरदार गोळीबार व उखळी (मोर्टार)तोफांचा मारा करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लघंन केले. पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून पाकला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पुंछमध्ये गोळीबार सुरू असताना पाकिस्तानकडून वाघा सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) मिठाईचे वाटप करण्यात आले. ‘आझादी का जश्न’ म्हणून पाकच्या वतीने बीएसएफच्या जवानांना मिठाईचे वाटप करण्यात आले. स्वत:च्या स्वातंत्र्यदिनी पाकने गोळीबार केल्याच्या वृत्ताला भारताच्या संरक्षण प्रवक्त्यानेही दुजोरा दिला आहे.स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी पहाटे ३ वाजतापासून पाकिस्तान स्वयंचलित मशीनगमधून गोळीबार करीत आहे. पाकने केलेल्या या गोळीबारात भारताचे आतापर्यंत नुकसान झाले नाही,अशी माहिती प्रवक्त्याने दिली.दरम्यान, पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उंल्लघन केले असून, याआधी पाकिस्तानने पुंछमध्ये १० एप्रिल रोजी गोळीबार केला होता. तर यावर्षी जानेवारी ते जूलै या सात महिन्याच्या काळात पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर तब्बल ३० वेळा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करू न गोळीबार केलेला आहे.
पाकिस्तानचे दुटप्पी धोरण; पुंछमध्ये गोळीबार
By admin | Published: August 14, 2016 3:07 PM