ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 8- राजस्थान पोलिसांना गुप्त एजन्सीकडून काही धक्कादायक माहिती मिळाली आहे. पाकिस्तान दर्ग्यातून जमा होणाऱ्या निधीचे पैसे भारतामध्ये दहशतवाद पसरविण्यासाठी फंडिंग करत असल्याची माहिती राजस्थान पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या इसिसच्या एका हेराच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे. इसिससाठी कामं करणारी लोक दर्ग्याच्या बाहेर दान पेटी ठेवतात आणि त्या दानपेटीत भाविकांकडून दान टाकलं जातं. त्याच पैशाचा वापर भारताच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये दहशतवादी कारवायांसाठी केला जातो. अशी माहिती राजस्थान पोलिसांना मिळाली आहे. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
बाडमेर जिल्ह्यातील सुदूर या गावातून मागील आठवड्यात इसिसच्या दीना खान या हेराला अटक करण्यात आली होती. त्याच व्यक्तीने काही गुप्त अधिकाऱ्यांसमोर ही गोष्ट कबूल केली आहे. खानच्या सांगण्यानुसार तो चोहटान गावातील एका छोट्या मजारीचा प्रभारी होता. त्याच्या मजारीत जमा होणाऱ्या दानापैकी 3.5 लाख रूपये त्यांनी सतराम माहेश्वरी आणि त्यांचा भाचा विनोद माहेश्वरी यांना दिले होते. दीना खान पाकिस्तानातील इसिस हॅडलर्सबरोबर फोनवरून संभाषण करतो, यातूनच त्याला पैसे कुठे वाटायचे याबदद्लचे आदेश मिळतात, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
दहशतवादी कारवायांना पैसा पुरविण्यासाठी सीमावर्ती भागात अनेक ठिकाणी दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत, अशी शंका पोलीस व्यक्त करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार हवालाच्या मार्फत पैसे वाटणं कठीण आहे कारण ते लगेच पकडता येतं. म्हणूनच पैसे जमविण्यासाठी आणि वाटण्यासाठी दानपेटी हे माध्यम सोपं आहे.