मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानच्या संघानं १० गडी राखून विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताला प्रथमच नमवलं. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात जल्लोष साजरा झाला. भारतातही काही ठिकाणी पाकिस्तानचा विजय साजरा करण्यात आला आहे. काश्मीरमध्येही पाकिस्तानचा विजय साजरा करण्यात आल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडीओदेखील ट्विट केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काश्मीरमध्ये असताना टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या विजयाचा आणि भारताच्या पराभवाचा जल्लोष साजरा होतो. हिंदुस्तानाविरोधात घोषणाबाजी होते, ही बाब चिंताजनक आहे. केंद्र सरकारनं या घटनेची नोंद गांभीर्यानं घ्यायला हवी, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रस्त्यावर सुरू असलेला जल्लोष दिसत आहे. काही जण हातात झेंडे घेऊन नाचत असून काही जण फटाके फोडून आनंद साजरा करत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २३ ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये बिगर काश्मिरींना लक्ष्य करण्यात येत आहे. स्थलांतरित मजुरांच्या दहशतवाद्यांनी हत्या घडवल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शाह तीन दिवसांपासून काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी काश्मिरी जनता, प्रशासकीय अधिकारी, सैन्य दलातील अधिकाऱ्यांशी संवाद झाला. थोड्या वेळापूर्वीच त्यांनी पुलवामात दोन वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मारकाजवळ जाऊन अभिवादन केलं.