- शीलेश शर्मा, नवी दिल्ली नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर निशाणा साधून भारतीय लष्कराने तडाखेबाज उत्तर दिले आहे. तथापि, पाकही दहशतवादी कारवायांचा जोर वाढवून भारतातील निवडक शहरे, लष्करी ठिकाणे व इतर प्रमुख ठिकाणांंवर दहशतवादी हल्ला करून पलटवार करू शकतो. कारण भारताशी थेट युद्ध करण्याची पाकिस्तानची तयारी नाही, असे सांगत संरक्षणतज्ज्ञ ब्रिगेडियर व्ही. महालिंगम म्हणाले की, आम्हाला सज्ज राहावे लागेल.‘लोकमत’शी बोलताना महालिंगम म्हणाले की, पाकिस्तान पलटवार करू शकतो. सीमापार सातत्याने होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस पावले उचलण्याआधी भारताने जगापुढे पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा पाडला. भारताने यादृष्टीने चांगले राजनैतिक प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, चीन आपल्याच समस्येत गुरफटला आहे. चीनला थेट हस्तक्षेप करण्यासाठी कोणताही आधार नाही. पाकिस्तानला शंभर वेळा विचार करावा लागेल...उरी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या बलिदानाचा बदला घेत भारताने चोख उत्तर दिले आहे, असे ठाम मत लेफ्ट. जनरल आर.एस. कदयाल यांनी व्यक्त केले. पाकिस्तान राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या एवढा दुबळा आहे की, पलटवार करण्याआधी पाकिस्तानला शंभर वेळा विचार करावा लागेल. दोन युद्धांत पाकिस्तानला भारताने धूळ चारली आहे. तेव्हा तो तिसऱ्यांदा अशी चूक करणार नाही. तथापि, नियंत्रण रेषेलगत २४ तास सतर्क राहावे लागेल. कारण आमच्यासाठी सीमा अधिक संवेदनशील बनली आहे. कोणत्याही क्षणी पाकिस्तानच्या बाजूने दहशतवादी हल्ला आणि घुसखोरी होऊ शकते. संरक्षणतज्ज्ञ आणि माजी डीजीएमओ विनोद भाटिया म्हणाले की, भारताने निवडक दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले. हल्ला केला नाही. ७-८ दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आम्हाला यश आले. भारताच्या संरक्षण धोरणात लक्षणीय बदल...पाकिस्तान पलटवार करू शकतो. तथापि, त्याचे स्वरूप कसे असेल, याचा अंदाज बांधणे सोपे नाही. भारताची क्षमता, सामर्थ्य पाकिस्तान जाणून आहे. तेव्हा असे पाऊल उचलण्याआधी पाकिस्तान याबाबत आकलन जरूर करील, असे निवृत्त एअर मार्शल ए. अहलुवालिया म्हणाले. भारताच्या संरक्षण धोरणात लक्षणीय बदल झाला आहे, असे बव्हंशी संरक्षणतज्ज्ञांना वाटते. आजवर भारत राजनैतिक धैर्याचे धोरण अंगीकारत होता. आता तर थेट हल्लाच केला आहे.
पाकची युद्धाची हिंमत नाही
By admin | Published: September 30, 2016 1:43 AM