ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 25 - दहशतवादाच्या मुद्यावरून भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले आहे. सोमवारी जिनेव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या (आयपीयू) बैठकीत भारताने पाकिस्तानचे थेट नाव घेत हा देश आता दहशतवादीची कर्मभूमी बनली असल्याचा टोला लगावला.
या बैठकीत पाकिस्तानने नेहमीप्रमाणे काश्मीर प्रश्नाचे रडगाणे सुरू केल्यावर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. "दहशतवादामुळे मानवाधिकाराचे मोठ्या प्रमाणावर हनन होत आहे आणि पाकिस्तान ही अशा दहशतवादासाठी कर्मभूमी ठरली आहे," असे टीकास्त्र भारताने सोडले.
गेल्या महिन्यात उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्यावरून भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला सातत्याने लक्ष्य करत आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेतही भारताने पाकिस्तानचा दहशतवादाची जननी असा उल्लेख केला होता.
दरम्यान, विविध राष्ट्रांच्या संसदांची संघटना असलेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या 135व्या परिषदेतही भारताने पाकिस्तानचा दशतवादी राष्ट्र म्हणून उल्लेख करायची संधी सोडली नाही. या परिषदेत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावाचा हवाला देत काश्मीर प्रश्न उपस्थित केल्यावर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने या ठरावातील उल्लेखानुसार सर्वप्रथम पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा सोडावा. त्याबरोबरच पाकिस्तानी तसेच पाकव्याप्त काश्मीर, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा येथील जनता दहशतवादाची शिकार होत आहेत, असा आरोप भारताने केला.