नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या तक्रारी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पालम स्टेशनवर चेतक एक्स्प्रेसचा स्टॉप करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, या मागणीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कानाडोळा केल्याने रेल्वे प्रवासी संघटनेने थेट डोनाल्ड ट्रम्प यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.
पालम स्टेशनवर चेतक एक्स्प्रेसचा स्टॉप करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेने डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरच्या माध्यमातून पत्र पाठविले आहे. रेल्वे प्रवासी संघटनेने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि रेल्वे मंत्रालयाकडे या मागणीबाबत प्रस्ताव पाठविला. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
चेतक एक्स्प्रेस दिल्लीतील सराय रोहिल्लाहून दररोज राजस्थानमधील उदयपूरला जाते. सराय रोहिल्लानंतर चेतक एक्स्प्रेस दिल्ली कॅंट रेल्वे स्टेशनवर थांबते. त्यानंतर गुरुग्रामला स्टॉप आहे. त्यामुळे रोज रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवासी संघटनेच्या लोकांनी पालम स्टेशनवर दोन मिनिटे चेतक एक्स्प्रेस थांबावी, अशी मागणी केली आहे. पालम स्टेशनवर चेतक एक्स्प्रेस थांबल्यास लांबच्या स्टेशनला प्रवाशांना जाण्याची गरज भासणार नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.